कोल्हापूर - ईटीव्ही भारतच्या बातमीत काही दिवसांपूर्वी किल्ल्यांच्या संवर्धनासाठी काही उपाय सुचवण्यात आले होते. या उपायांचा ठराव दुर्गपरिषेदेत ठेवण्यात आला. खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या वाढदिवसांनिमित्त भरवण्यात आलेल्या या परिषदेत राज्यातील २२७ संघटनेचे शिवप्रेमी दाखल झाले होते. वासोट्या किल्ल्यांच्या धर्तीवर सर्वच किल्ल्यांवर प्लास्टिक बंदी करा, अशा प्रकारची बातमी ईटीव्ही भारतने प्रसारित केली होती. त्याची दखल संभाजीराजे छत्रपती यांनी घेत याचा ठराव केला.
'ईटीव्ही भारत'ने बातमीत दिलेल्या उपायांवर ठराव करण्यात आला ईटीव्ही भारतने काय भूमिका मांडली होती - राज्यातील अनेक गडकिल्ल्यांवर जाणाऱ्या वाटा या एखाद्या गावातून जातात. अशा वेळी ग्रामपंचायतीला विशेष अधिकार दिले पाहिजेत. जेणे करून, येणाऱ्या जाणाऱ्या पर्यटकांच्या नोंदी ग्रामपंचायतींकडे राहतील. शिवाय गडांच्या सुरक्षेतेची, स्वच्छतेची आणि पवित्र्या राखण्याची जबाबदारी योग्य पद्धतीने घेतली जाईल. येणाऱ्या-जाणाऱ्या पर्यटकांच्या बॅग्स तपासणे, त्यांच्यावर कारवाई करून रक्कम वसूल करणे, इत्यादी बाबी ग्रामपंचायत पातळीवर केल्या तर निश्चितच याचा फायदा येईल.
वासोटा किल्ल्याचे उदाहरण आणि नियोजन -
सातारा जिल्ह्यातील वासोटा किल्ला हा फॉरेस्ट विभागाच्या अधीन आहे. त्यामुळे गडावरील स्वच्छता, त्याचे पावित्र्य राखण्याची जबाबदारी वनविभागाने उत्तम प्रकारे घेतली आहे. शिवाय जंगली पशुपक्ष्यांना हुल्लडबाजीचा त्रास होऊ नये याची काळजी देखील कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. दिवसाला दोन वेळा गस्त घातली जाते. शिवाय गडावर जाताना प्रत्येक पर्यटकांची बॅग तपासली जाते. त्यामध्ये किती साहित्य आहे, याची नोंद ठेवली जाते. बॅगमधील साहित्य परत खाली आले की? गडावर फेकून दिले याची काळजी घेतली जाते. शिवाय नेलेल्या वस्तू परत न आल्यास त्यांच्याकडून ५०० रुपयांचा दंड आकाराला जातो. त्यामुळे एक वेगळी जरब पर्यटकांवर बसली आहे. गडकिल्ल्यांच्या पायथ्याला असणाऱ्या पोलीस स्टेशन, ग्रामपंचायतीला असे अधिकार दिल्यास किल्ल्यांचे संरक्षण होऊ शकते. त्याच धर्तीवर राज्यातील गडकिल्ल्यावर प्लास्टिक बंदी करण्यात यावी. तसेच प्रत्येक ग्रामपंचायतींना संरक्षणाची जबाबदारी द्यावी, अशी भूमिका ईटीव्ही भारतने मांडली होती.
प्लास्टिक बंदीसाठी पत्रव्यवहार -
राज्यातील गडकिल्ल्यावर प्लास्टिक बंदीसाठी ग्रामपंचायतींनी पुढाकार घ्यावा, या मागणीसाठी लवकरच राज्यसरकार सोबत पत्रव्यवहार करणार आहे. तसेच ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी चर्चा करणार असल्याचे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले.
फोर्ड फेडरेशनची स्थापना -
गडसंवर्धनासाठी प्रत्येक शिवप्रेमी संघटना कार्य करत आहे. राज्यात अशा २२८ संघटना काम करतात. त्यांना एका छताखाली आणण्यासाठी आणि गडसंवर्धन चळवळीला बळकटी देण्यासाठी फोर्ड फेडरेशनची स्थापना करण्याची घोषणा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केली. केंद्र व राज्य सरकारच्या पुरातत्व विभागाशी चर्चा करून हे फेडरेशन काम करेल, तसेच पर्यटन, सांस्कृतिक व वनविभागाशी समन्वय साधला जाणार आहे.
दुर्ग परिषदेत झालेले ठराव -
- गडकिल्ल्यांच्या संवर्धनासह रायगड प्राधिकरणाच्या माध्यमातून केलेल्या कार्याबद्दल खासदार संभाजीराजे यांचे अभिनंदन.
- राज्यातील गडकिल्ल्यांच्या जतन व संवर्धनासाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करा.
- राज्यातील सर्व शाळा, विद्यापीठांमध्ये गडकिल्ल्यांच्या संवर्धन, जतन याविषयी अभ्यासक्रम सुरू करावा.
- ज्या गडकिल्ल्यांची नोंद पुरातत्त्व खात्याकडे नाही. त्यांची नोंद राज्य पुरातत्त्व खात्याने करावी.
- वासोट्या किल्ल्याच्या धर्तीवर सर्वच किल्ल्यांवर प्लास्टिक बंदी करा.
- दुर्ग संवर्धनाच्या कामाकरिता सर्वच संस्थांना खासदार संभाजीराजे यांच्या अध्यक्षतेखाली एकत्रित काम करण्यासाठी संस्था उभारावी.
- छत्रपती राजाराम महाराजांची आठवण असणाऱ्या मेन राजाराम हायस्कूल इमारतीचे संवर्धन करावे.