कोल्हापूर- कोल्हापुरात प्रथमच डेल्टा प्लसचा पहिला रुग्ण सापडला आहे. मात्र धक्कादायक बाब म्हणजे या रुग्णांची चाचणी मे महिन्यात करण्यात आली होती. त्याचा अहवाल तब्बल दोन महिन्याने आल्याने कोल्हापूरकरांची चिंता वाढली आहे. दरम्यान महानगरपालिकेची आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाल्याने योग्य खबरदारी घेतली आहे. दरम्यान राज्य सरकारच्या या गोंधळामुळे कोल्हापुरात भीतीचे वातावरण आहे. या दोन महिन्याच्या कालावधीत अनेक चाचण्या झाल्या असून त्याचे अहवाल अद्याप प्राप्त नसल्याची माहिती समोर येत आहे. अहवाल उशिरा येत असल्याने सर्वसामान्य जनतेला ही बाब जीवघेणी ठरु शकते.
कोल्हापूर शहरातील उपनगरातील एक महिला डेल्टा प्लसने बाधित असल्याचा अहवाल रविवारी महानगरपालिका प्रशासनाला प्राप्त झाला. त्यामुळे कोल्हापुरात प्रथमच डेल्टाचा रूग्ण सापडल्याने संबंधित आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश पवार, डॉ. रमेश जाधव आणि डॉ. अमोल माने यांच्यासह आरोग्य अधिकाऱ्यांनी संबंधित महिलांच्या घरी जाऊन पाहणी केली. दरम्यान महिलेच्या कॉन्टॅक्टमध्ये आलेल्या अन्य नातेवाईकांची तपासणी केली. या सर्व बाबीत संबंधित महिला पूर्णपणे सुरक्षित आहे. धक्कादायक बाब म्हणजे या महिलेचे तपासणी 28 मे रोजी केली होती. त्याचा स्वब तपासणीसाठी पुणे येथे पाठवला होता. तब्बल दोन महिने उशिराने याचा अहवाल कोल्हापूर महानगर पालिकेला प्राप्त झाले आहेत. या अहवालात संबंधित महिला डेल्टा प्लसने बाधित असल्याचे सांगण्यात आले आहे.