कोल्हापूर - एकीकडे देशभरात 'अनलॉक'ची प्रक्रिया राबवली जात असताना कोल्हापूरच्या कागल तालुक्यात मात्र पुढचे 10 दिवस जनता कर्फ्यूची घोषणा करण्यात आली आहे. 6 सप्टेंबरपासून 15 सप्टेंबरपर्यंत कागल तालुका पूर्णपणे लॉकडाऊन करण्यात येणार आहे. ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी याबाबत माहिती दिली.
लॉकडाऊन दरम्यान औषधांची दुकाने, दूध, कृषी केंद्रे सुरू राहणार आहेत. शिवाय खासगी आणि शासकीय नोकरदार आपले ओळखपत्र दाखवून नोकरीसाठी बाहेर पडू शकणार आहेत. तालुक्यात आत्तापर्यंत 748 हून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत तर 10 जणांचा आत्तापर्यंत मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी हसन मुश्रीफ यांनी हा निर्णय घेतला असल्याचे म्हटले आहे. शिवाय गेल्या काही दिवसांपासून तालुक्यातून अनेकजण लॉकडाऊन करण्याबाबत सूचना करत होते. त्यानुसार आज कागलमधील सर्वच पदाधिकाऱ्यांच्यासोबत बैठक घेऊन हा निर्णय घेतला असल्याचेही त्यांनी सांगितले.