कोल्हापूर - लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणार्या करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर परिसरातील देवस्थान समितीच्या ५ हजार चौरस फूट जागेत विविध विक्रेत्यांनी अतिक्रमण केले आहे. येत्या १५ दिवसांत संबंधितांनी स्वतःहून अतिक्रमण हटवावं, अन्यथा त्यानंतर कारवाईद्वारे मंदिर परिसरातील अतिक्रमणं हटवण्याची भूमिका आज देवस्थान समितीनं जाहीर केली.
अंबाबाई मंदिर परिसरातील अतिक्रमण हटवण्यासाठी १५ दिवसांची मुदत
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणार्या करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर परिसरातील देवस्थान समितीच्या ५ हजार चौरस फूट जागेत विविध विक्रेत्यांनी अतिक्रमण केले आहे. पाहणीमध्ये मंदिर परिसरातील सुमारे ५ हजार चौरस फूट जागा अनेक अतिक्रमणांनी व्यापली असल्याची धक्कादायक कबुली समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी दिली.
पश्चिम महाराष्ट्रात देवस्थान व्यवस्थापन समितीच्या अखत्यारित कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील ३ हजारांपेक्षा अधिक लहान-मोठी मंदिरं येतात. यामध्ये प्रामुख्यानं करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर, वाडी रत्नागिरीचं श्री जोतिबा मंदिर, ओढ्यावरील सिद्धीविनायक मंदिर, श्रीक्षेत्र नृसिंहवाडीमधील दत्त मंदिर यांसह अन्य प्रमुख मंदिरांचा समावेश आहे. याचबरोबर देवस्थान समितीच्या लाखो एकर इनाम जमिनीसुद्धा या तीन जिल्ह्यांत पसरलेल्या आहेत. मात्र, देवस्थान समितीच्या मालकीची नक्की किती हेक्टर जमीन आहे, याचा आज अखेर थांगपत्ताच नाही. या जमिनीची मोजदादसुद्धा आता सुमारे ६ कोटी रुपये खर्चून करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर देवस्थान समितीनं ११ फेब्रुवारीला श्री अंबाबाई मंदिर परिसरातील देवस्थान समितीच्या मालकीच्या जागेची मोजणी आणि निश्चिती करण्याचं काम शासन आदेशानुसार हाती घेतलं होतं. १६ फेब्रुवारीला मंदिर परिसरातील सर्व जागेची चतुःसीमा निश्चित करण्यात आली आणि त्याचा अहवाल २० मार्चला देवस्थान समितीला प्राप्त झाला. यानंतर देवस्थान समितीने आज मंदिर परिसरातील जागेची पाहणी केली. मंदिराच्या चारही बाजूला फूलं आणि पूजेच्या साहित्याची विक्री करणार्यांचं अतिक्रमण झालंय. आजच्या पाहणीमध्ये मंदिर परिसरातील सुमारे ५ हजार चौरस फूट जागा अनेक अतिक्रमणांनी व्यापली असल्याची धक्कादायक कबुली समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी दिली. ही सर्व अतिक्रमणं १५ दिवसांत संबंधितांनी काढून घ्यावीत. अन्यथा कारवाईद्वारे ती हटवण्यात येतील, अशी भूमिका देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी पाहणीनंतर पत्रकारांशी बोलताना जाहीर केली.
महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक प्रमुख शक्तीपीठ करवीर निवासिनी श्री अंबाबाई असल्यानं देवी दर्शनासाठी येणार्या भाविकांना जास्तीत जास्त चांगल्या सुविधा आणि सुरक्षा मिळणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं असल्याच्या प्रतिक्रिया भविकांमधून व्यक्त होत आहेत.