कोल्हापूर - दरवर्षी 15 जूनला सुरू होणारी शाळा कोरोना संकटामुळे अजूनही सुरू झाली नाही. त्याला पर्याय म्हणून राज्य शासनाने ऑनलाईन शिक्षण सुरू करण्याचा घाट घातला. मात्र, हे ऑनलाईन शिक्षण राज्यातील कानाकोपऱ्यात आणि खेडोपाड्यात पोहोचू शकेल का, याचा विचार सरकारने केलेला दिसत नाही.
ऑनलाईन शिक्षणात देण्यात आणि घेण्यात अनेक अडचणी आहेत. मात्र, कोल्हापूरातील काही शिक्षकांनी या अडचणीवर एक नाविन्यपूर्ण उपाय शोधून काढला आहे. त्यामुळे मुलांनाही शिक्षण मिळू लागले आहे. त्यांचा हा उपाय नेमका काय आहे, याचा ईटीव्ही भारतने आढावा घेतला आहे.
हेही वाचा...ईटीव्ही भारत विशेष; ग्रामीण भागात ऑनलाईन शिक्षण 'बोजवारा'; स्मार्टफोन, इंटरनेटची पालकांपुढे समस्या
शाहूवाडी तालुक्यातील अणुस्कुरा केंद्र शाळेतील शिक्षक दशरथ आयरे आणि प्रकाश गताडे हे प्रत्येक व्यक्तीला असेला शिक्षणाचा हक्क प्राप्त व्हावा, यासाठी नेहमीच धडपडत असतात. कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, म्हणून अजूनही शाळा बंद आहेत. पण राज्य शासनाने ऑनलाईन शाळा सुरू करण्याच्या सूचना दिल्या. राज्य शासनाने सूचना दिल्या खऱ्या मात्र शिक्षक कोणकोणत्या भागात शिकवतात? त्या भागात काही प्राथमिक सुविधा तरी आहेत का? याचाही शासनाने कदाचित विचार केला नसावा.
कारण हे दोन्ही शिक्षक ज्या शाळेत शिकवतात, त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी साधा रस्ताही नाही. तिथे कसले इंटरनेट आणि कसली ऑनलाईन शाळा ? मुलांच्या पालकांना इंटरनेट म्हणजे काय, हे सांगावं लागते. तिथे ऑनलाईन शाळेचा प्रश्नच येत नाही. मात्र, प्रकाश गाताडे या शिक्षकाने एक नाविन्यपूर्ण असा उपाय शोधून काढला. इंटरनेट सुविधा उपलब्ध नाही, अशा गावात जाऊन शिक्षक त्या गावातील चौकात किंवा प्रत्येक गल्लीतील एखाद्याच्या घराच्या दारात फिजिकल डिस्टन्सिंग पाळून मुलांचा अभ्यास घेत आहेत. त्यामुळे मुलांना शाळेत न येता त्यांच्या घराच्या दारातच शिक्षण घेता येऊ लागले आहे.