कोल्हापूर -लॉकडाऊनमुळे मजूर नाहीत. अशावेळी गावातील सुतार कारागिरांना हाताशी धरून आपल्या शिक्षण मंदिरावरची कौले शिक्षकांनी बदलली आहेत. पावसापूर्वी शाळेची डागडुजी करून विद्यार्थ्यांना सुरक्षित शिक्षण देता यावे, या उद्देशाने चंदगड तालुक्यातील मजरे कारवे येथील महात्मा फुले विद्यालय व ज्युनिअर कॉलेजच्या शिक्षकांनी स्वतः कौले बदलली आहे. पाहुयात ईटीव्ही भारतचा हा विशेष रिपोर्ट.
कोल्हापूर विशेष - शिक्षण मंदिराची शिक्षकांनीच बदलली कौले शिक्षकांनीच स्वतः पुढाकार घेत कामाला केली सुरुवातचंदगड तालुक्यातील मजरे कारवे गावातील शाळा साठ वर्षांपूर्वीची आहे. दरवर्षीच्या वादळी वाऱ्यामुळे व माकडांच्या उपद्रवामुळे वाताहत झाली आहे. शाळेची कौले फुटली असून पावसाळ्यात शाळेतील सर्व वर्गात छपरातून पाणी गळते. त्यामुळे भविष्यात होणारी अडचण लक्षात घेऊन व माजी विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार या शाळेची डागडुजी करण्याचा निर्णय शाळा प्रशासनाने घेतला. मात्र लाॅकडाऊनमुळे मजुरांचा अभाव व वाढलेली मजुरी यामुळे हे काम करणार कोण? असा सवाल शाळा प्रशासनासमोर पडला. यावर शिक्षकांनीच तोडगा काढत, स्वतः पुढाकार घेत कौले बदलाच्या कामाला सुरुवात केली.
वर्गात शिकवणारे शिक्षक आज शाळेवर
नेहमी हातात छडी, पुस्तक घेऊन घेऊन शिकवणारे शिक्षक आज शाळेच्या छपरावर आहेत. रागावणारे, मारणारे शिक्षक आज शाळेच्या प्रेमापोटी काम करत असल्याचे पाहून विद्यार्थ्यांना देखील अभिमान वाटत आहे. शिवाय शाळेवरती चढून स्वतः कौले बसवण्याचा उपक्रम केल्याने चंदगड तालुक्यात या शिक्षकवृंदाचे कौतुक होत आहे.
चंदगड तालुक्याच्या पर्जन्यमानप्रमाणे घरांची रचना
चंदगड तालुका हा तसा अती पावसाळी भाग म्हणून ओळखला जातो. त्यामुळे पावसाळ्यात पाण्याचा निचरा होण्यासाठी अनेक ठिकाणी उतरत्या छपराची घर बांधण्यात आली आहेत. सिमेंट काँक्रीटच्या संस्कृतीत मंगलोरी कौलाची घरे आहेत. त्यामुळे शाळादेखील त्याच पद्धतीने बांधल्या आहेत. ही कौले शाळेच्या सौंदर्यात अधिकच भर घालतात. मात्र दरवर्षीच्या वादळी वाऱ्यामुळे आणि माकडांच्या उपद्रवामुळे अनेक वेळा कौले फुटतात. त्यामुळे पावसापूर्वी अशा कौलारू छपरांची स्वच्छता व तुटलेल्या कौलाच्या ठिकाणी नवीन कौले बसवावी लागतात.
शिक्षकांच्या निर्णयाचे जिल्हाभर कौतुक
सध्या लाॅकडाऊन असल्यामुळे पावसापूर्वी शाळेची कौले बदलण्यासाठी शेतकरी पुत्र असलेल्या शिक्षकांनी स्वतः कौले बदलण्याचा निर्णय घेतला. गेले चार दिवस सकाळी ८ ते अकरा या वेळेत हा उपक्रम सुरू आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व उन्हाळी सुट्टी असल्याने शाळा बंद आहेत. तरीही सर्व शिक्षकांनी एकत्र येऊन शाळेवरील कौले बदलण्यासाठी दिलेला वेळ अमूल्य असून त्यांच्या या कार्याचेजिल्हाभर कौतुक होत आहे.
हेही वाचा - राज्यातील वेगवेगळ्या कारागृहांमधील 13 कैदी, 9 कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू