कोल्हापूर - निवडणुकीचा भत्ता मागणाऱ्या शिक्षकांना धक्काबुक्की झालेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर शिक्षकांनी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना निवेदन देऊन संबंधित पोलीस निरीक्षक प्रकाश गायकवाड यांच्यावर कारवाई व्हावी तसेच संबंधित प्रांताधिकारी यांची चौकशी व्हावी, अशी मागणी करण्यात आली. शिवाय आम्हाला सन्मानाची वागणूक देता येत नसेल तर निवडणुकीची कामे देऊ नका, असेही शिक्षकांनी म्हटले आहे.
कोल्हापूरच्या गडहिंग्लज येथे निवडणुकीचा भत्ता मागणाऱ्या शिक्षकांना धक्काबुक्की झाल्याची घटना मंगळवारी घडली. २२ आणि २३ एप्रिल असे दोन दिवस पूर्णवेळ काम करूनही ठरल्या प्रमाणे २२०० रुपये न देता केवळ ३०० रुपये देत असल्याने संतप्त झालेल्या शिक्षकांनी जाब विचारण्याचा प्रयत्न केला. जाब विचारत असतानाच पोलीस निरीक्षक प्रकाश गायकवाड यांच्याकडून धक्काबुक्की करण्यात आली. शिवाय संबंधित प्रांताधिकारी यांनी सुद्धा आमच्याशी सन्मानपूर्वक वागणूक दिली नसल्याचे शिक्षकांनी म्हटले आहे. त्यानुसार आज जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना निवेदन संबंधित घटनेची चौकशी व्हावी याबाबतचे निवेदन देण्यात आले. शिवाय जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा घडलेल्या घटनेबद्दल दिलगिरी व्यक्त करत या घटनेची चौकशी करू, असे आश्वासन दिले, त्यानंतर संतप्त शिक्षक शांत झाले आहेत.