कोल्हापूर - स्वाभिमानी शेतकरी संघटना महाविकास आघाडी सरकारचा घटक पक्ष असला तरी संघटना नेहमीच सामान्य जनतेसोबत राहिली आहे. वेळ पडली तर आम्ही महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरू, मात्र सरकारचा कोणताही अन्याय सहन करणार नाही. तसेच वाढीव वीज बिलांसंदर्भात लवकरच रस्त्यावरची लढाई सुरू करणार असल्याचीही प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना दिली.
महाविकास आघाडी विरोधात रस्त्यावर उतरणार - राजू शेट्टी वीज तोडणी स्थगितीचा निर्णय का रद्द केला?
शेट्टी म्हणाले, वीज बिलांसंदर्भात महाविकास आघाडी सरकारने वेळोवेळी सकारात्मक भूमिका दाखवली आहे. ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी 100 युनिट वीज माफ करण्याची ग्वाही दिली होती. लॉकडाऊन काळातील एप्रिल मे आणि जून महिन्यातील 300 युनिट वीज बिल माफ करण्यासाठी तीन हजार कोटी लागतील, असे त्यांच्या अहवालात स्पष्ट करण्यात आले होते. त्याचा राज्यातील एक कोटी 25 लाख ग्राहकांना लाभ मिळणार होता. प्रत्येक कुटुंबाचे दोन हजार रुपये बचत होईल. मात्र अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी महाविकास आघाडी सरकारने वीज तोडणी स्थगितीचा निर्णय रद्द केला. त्यामुळे जनतेमध्ये पुन्हा असंतोष निर्माण झाला आहे.
महाविकास आघाडीने जनतेचा विश्वासघात केला-
अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी पुढील निर्णय होईपर्यंत वीज तोडणीला स्थगिती द्यावी, असा निर्णय घेतला होता. वीज बिलसंदर्भात योग्य निर्णय होईल, अशी अपेक्षा सर्वसामान्य जनतेची होती. मात्र अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी वीज तोडणी स्थगिती निर्णय रद्द केला. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्रातील जनतेचा विश्वासघात केला, अशी टीका राजू शेट्टी यांनी केली. वीज बिलासंदर्भात एखादी दिलासादायक घोषणा करणे सोडलेच, यांनी जनतेची फसवणूक करण्याशिवाय दुसरे काय केले नाही. त्यामुळे अजूनही वेळ गेली नाही. मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेऊन सर्वसामान्य जनतेला दिलासा द्यावा, अशी भूमिका शेट्टी यांनी व्यक्त केली.
जनतेचा भ्रमनिरास करू नका-
यासंदर्भात महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये वेगवेगळी मते आहेत. एकदा देतो, एकदा नाही असे म्हणत राज्याची आर्थिक परिस्थिती नाही म्हणतात. त्यामुळे तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी एकत्र बसून निर्णय घ्यावा, सर्वसामान्य जनतेच्या भ्रमनिरास करू नका, अन्यथा स्वाभिमानी लवकरच रस्त्यावर उतरेल, असा इशारा शेट्टी यांनी दिला.