कोल्हापूर - ऊस दराबाबत कारखानदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्यात सुरू असणारी बैठक फिस्कटली आहे. या बैठकीतून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी काढता पाय घेतला. तर, 23 नोव्हेंबरला होणाऱ्या स्वाभिमानीच्या ऊस परिषदेत अंतिम निर्णय होईपर्यंत जिल्ह्यातील कोणताच साखर कारखाना सुरू करू देणार नसल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे.
ऊस दराबाबत तासभर झालेल्या बैठकीतील चर्चेत कारखानदारांनी स्वाभिमानीच्या पदाधिकाऱ्यांना समोर ठेवलेला प्रस्ताव अमान्य झाल्यानंतर बैठक फिस्कटली. एफआरपीचे तुकडे करण्याचा कारणावरून साखर कारखानदार आणि शेतकरी संघटनेत मतभेद झाल्याने या बैठकीतून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी काढता पाय घेतला. शेतकरी संघटनेच्या ऊस परिषदेनंतर पुन्हा एकदा ऊस उत्पादक शेतकरी आणि कारखानदार यांच्यात बैठक होईल असे कारखानदारांनी सांगितले. तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि कारखानदार यांच्यात संघर्षाची वेळ येणार नसल्याचेही सतेज पाटील म्हणाले.