कोल्हापूर -राजू शेट्टी यांच्या नावावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून पक्षातर्फे जागा देण्याचे घोषित केले होते. यानंतर शेट्टींवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेमधूनच काही कार्यकर्त्यांनी टीका केली. त्यावर राजू शेट्टी यांनी आमदारकी न स्वीकारण्याची भावना मनात असल्याचे म्हटले आहे. यावर आता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी, 'शेट्टी साहेब राज्यपाल कोट्यातून जाहीर केलेली विधानपरिषदेची उमेदवारी स्वीकारा, अन्यथा पन्हाळा आणि शाहूवाडी तालुक्यातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते संघटनेला सोडचिठ्ठी देऊ' असा इशारा दिला आहे.
पन्हाळा तालुक्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटना युवा आघाडीचे अध्यक्ष विक्रम पाटील यांनी याबाबत ईटीव्ही भारतला प्रतिक्रिया दिली आहे. राजू शेट्टी यांनी त्यांचा निर्णय कोणत्याही परिस्थितीत बदलू नये, अशी विनंती शेट्टी यांना केली आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटना युवा आघाडी पन्हाळा तालुका अध्यक्ष विक्रम पाटील यांची प्रतिक्रिया... हेही वाचा...आमदारकीसाठी शेट्टींनी स्वाभिमान विकला, जय शिवराय किसान संघटनेची टीका
राजू शेट्टी यांना राज्यपाल नियुक्त जागेवर राष्ट्रवादी पक्षाकडून विधानपरिषदेची उमेदवारी शरद पवारांनी जाहीर केली. यामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंद होता. परंतु, काल (बुधवार) स्वाभिमानी शेतकरी संघटनेतीलच विशेष म्हणजे राजू शेट्टी यांचे खंदे समर्थक मानले जाणारे, जालंधर पाटील आणि सावकार मादणाईक यांनी राजू शेट्टींच्या या उमेदवारीबाबत टीका केली. राजू शेट्टी यांनी विधानपरिषदेसाठी कार्यकर्त्यांना संधी द्यायला हवी होती, असे म्हणत त्यांनी टीकास्त्र सोडले होते.
जवळच्या कार्यकर्त्यांच्या या टीकेनंतर राजू शेट्टी यांनी मात्र, 'या विधानपरिषदेच्या उमेदवारीमुळे संघटनेत दुरावा निर्माण होणार असेल तर ही ब्यादच नको' असे म्हणत आमदारकी स्वीकारणार नसल्याचे म्हटले. त्यानंतर आता राज्यभरातील संघटनेचे कार्यकर्ते राजू शेट्टी यांना, असा कोणताही निर्णय घेऊ नये ,अशी विनंती करता दिसत आहेत. कोल्हापुरातील पन्हाळा आणि शाहुवाडी तालुक्यातील कार्यकर्त्यांनी तर आपण पदाचे आणि पक्षाचे सामूहिक राजीनामे देऊ, असे म्हटले आहे.
हेही वाचा...'हे फक्त पेल्यातील वादळ... लवकरच मिटेल'
'ईटीव्ही भारत'ला दिलेल्या विशेष मुलाखतीत राजू शेट्टी यांनी 'हे फक्त पेल्यातील वादळ आहे, दोन दिवसात सर्व ठीक होईल' असे म्हटले. त्यामुळे विधानपरिषदेची उमेदवारी राजू शेट्टी स्वीकारणार की नाही, हे सुद्धा त्यांच्या बोलण्यात स्पष्ट होत आहे. त्यामुळे आता कार्यकर्त्यांच्या या पवित्र्यानंतर शेट्टी काय निर्णय घेतात, हे पाहावे लागेल.
राजू शेट्टींना उमेदवारी जाहीर आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या संमिश्र भावना...
खासदार शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या कोट्यातून, राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना आमदारकी देण्याची घोषणा केली. त्यानंतर स्वाभिमानी पक्षातूनच टीका व्हायला सुरुवात झाली. राजू शेट्टी यांच्या सर्वात जवळ असलेल्या दोन पदाधिकाऱ्यांनी राजू शेट्टी यांच्या निर्णयावर थेट नाराजी व्यक्त केली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रा. जालंदर पाटील आणि नुकतीच शिरोळ विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवलेले सावकार मादनाईक हे दोघेही नाराज झाले आहेत. गेल्या अनेक वर्ष आम्ही चळवळीत काम करतोय. आम्हाला सुद्धा पदाची इच्छा का असू नये? म्हणत या पदाधिकाऱ्यांनी शेट्टींवर नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे स्वाभिमानीत फूट पडते की काय? अशी परिस्थिती या दोन्ही कार्यकर्त्यांच्या नाराजीवरून दिसून येत आहे. दरम्यान, स्वाभिमानीत फूट पडल्यास शेतकरी चळवळीचे मोठे नुकसान होणार यात शंका नाही.
पदाधिकाऱ्यांच्या उघड भुमिकेनंतर शेट्टींकडून उमेदवारीबाबत मोठा निर्णय...
एकीकडे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी उघड उघड भुमिका घेतल्यानंतर राजू शेट्टी हे प्रचंड दुखावले गेल्याचे त्यांच्या फेसबूक पोस्टमधून दिसून आले. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये 'या विधानपरिषदेच्या उमेदवारीमुळे संघटनेत दुरावा निर्माण होणार असेल तर ही ब्यादच नको' असे म्हणत आमदारकी स्विकारणार नसल्याचे म्हटले. त्यानंतर त्यांनी ईटीव्ही भारतला दिलेल्या विशेष मुलाखतीत, आपण फेसबुकद्वारे भावना व्यक्त केल्याचे सांगितले. तसेच त्यात उल्लेख केल्यानुसार, कार्यकर्त्यांनीच निर्णय घेऊन त्यांचे नाव पुढे केले होते आणि हाच निरोप घेऊन आपण शरद पवार यांना भेटलो. त्यामुळे याबाबत आणखी काहीही बोलणार नसल्याचेही स्पष्ट केले. तसेच हे फक्त पेल्यातील वादळ आहे आणि ते लवकरच मिटेल, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.