महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शेतकऱ्यांचा सत्याग्रह, आंदोलनाची व्याप्ती पाहून सरकार हादरले - राजू शेट्टी

सत्याचा आग्रह केला की सत्याचाच विजय होतो. म्हणून आंदोलनाची व्याप्ती पाहून सरकार हादरले आहे. नृसिंहवाडी येथे जाऊन पुढील निर्णय घेणार, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिला आहे.

राजू शेट्टी आंदोलन
राजू शेट्टी आंदोलन

By

Published : Sep 5, 2021, 2:49 PM IST

Updated : Sep 5, 2021, 4:27 PM IST

कोल्हापूर -पूरग्रस्त शेतकऱ्यांचे आंदोलन म्हणजे शेतकऱ्यांचा सत्याग्रह आहे. सत्याचा आग्रह धरत शेवटपर्यंत लढत राहणे हे शेतकऱ्याचे काम आहे. सत्याचा आग्रह केला की सत्याचाच विजय होतो. म्हणून आंदोलनाची व्याप्ती पाहून सरकार हादरले आहे. नृसिंहवाडी येथे जाऊन पुढील निर्णय घेणार, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिला आहे. आज पंचगंगा परिक्रमा यात्रा ही हेरवाड येथे पोहोचली, त्यावेळी ते बोलत होते.

'कोणताही अनुचित प्रकार करणार नाही'

पुढे राजू शेट्टी म्हणाले, की जिल्हाधिकारी राहुल रेखावार आणि जिल्हा पोलीस प्रमुख शैलेश बलकवडे यांच्याशी चर्चा झाली. पंचगंगा परिक्रमा यात्रा नृसिंहवाडी येथे पोहोचेपर्यंत कोणताही अडथळा पोलीस प्रशासन करणार नाही, अशी ग्वाही जिल्हा प्रशासनाने दिली आहे. प्रशासन अडथळा आणत नसेल तर आम्ही कोणताही अनुचित प्रकार करणार नाही, अशी भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून घेण्यात आली आहे. नृसिंहवाडी येथे गेल्यानंतर सभा घेतली जाईल. त्यानंतर पुढील दिशा ठरवली जाईल, असे राजू शेट्टी म्हणाले.

'शाश्वत कामे करावीत'

या आंदोलनाच्या माध्यमातून पूरग्रस्त शेतकऱ्यांचा प्रचंड आक्रोश दिसत आहे. आज प्रचंड प्रमाणात शेतकरी रस्त्यावर उतरला आहे. त्यामुळे प्रशासन हादरले आहे. चर्चेसाठी कोणतीही दारे बंद केलेली नाहीत. शेतकर्‍यांशी चर्चा करूनच पुढील निर्णय घेतला जाणार आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून केवळ दोनच मागण्या प्रमुख आहेत. पूरग्रस्त शेतकऱ्यांना झालेली नुकसानभरपाई मिळावी. पुन्हा महापूर येणार नाही अशी शाश्वत कामे राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून करावीत, अशी मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून केली आहे.

Last Updated : Sep 5, 2021, 4:27 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details