कोल्हापूर - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी आज देशाचा अर्थसंकल्प जाहीर केला. त्यामधून नेमकं काय जाहीर केले आणि कोणासाठी केले हाच केवळ मोठा प्रश्न आहे. पोकळ दावे आणि त्या दाव्यांचे बुडबुडे यांच्याशिवाय या बजेटमध्ये काहीच नाही. शिवाय कृषी क्षेत्राला तर भला मोठा भोपळा त्यांनी दिला असल्याची प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी व्यक्त केली आहे. शिवाय अनेक घोषणा यापूर्वी सुद्धा केल्या होत्या, नवीन काय केले हे सांगा. नेहमीप्रमाने यावेळी सुद्धा बजेटमधून निराशा हाती लागल्याचेही शेट्टींनी म्हटले.
कोरोनाकाळात केवळ कृषी क्षेत्राने अर्थव्यवस्था स्थिरस्थावर ठेवण्यासाठी आपले योगदान दिले -
एकीकडे कोरोनाकाळात देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे घसरली होती. मात्र केवळ कृषिक्षेत्राने ज्या पद्धतीने शेषनागाने पृथ्वीला सावरले होते त्याच पद्धतीने कृषी क्षेत्राने अर्थव्यवस्थेला सावरलं होते. आजच्या बजेटमधून 16 हजार कोटींच्या कृषी कर्जाची घोषणा केली. मात्र ही गेल्यावेळी सुद्धा केली होती. शिवाय मागच्या सरकारने सुद्धा केली होती. तुम्ही नवीन काय केले, असा सवाल शेट्टी यांनी व्यक्त केला आहे.
अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांसाठी केवळ पोकळ दावे, कृषी क्षेत्राला भोपळा - राजू शेट्टी - राजू शेट्टी
पोकळ दावे आणि त्या दाव्यांचे बुडबुडे यांच्याशिवाय या बजेटमध्ये काहीच नाही. शिवाय कृषी क्षेत्राला तर भला मोठा भोपळा त्यांनी दिला असल्याची प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी व्यक्त केली आहे.
आजचा अर्थसंकल्प सादर करत असताना अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी टॅबद्वारे पेपरलेस अर्थसंकल्प सादर केला. त्यामुळे आता शेतकरी सुद्धा पेपरलेस झाला आहे. शेतकऱ्यांच्या खिशातील नोटा सुद्धा गायब झाल्या असून त्यांच्या हातात आता केवळ खुळखुळा राहिला असल्याचेही राजू शेट्टी यांनी म्हटले आहे. आजच्या अर्थसंकल्पाचे केवळ याच पद्धतीने वर्णन करता येऊ शकतं, असेही त्यांनी म्हटले.
अण्णा हजारेंच्या उरलेल्या काही समर्थकांना आता शीतगृहात ठेवण्याची वेळ -
दोनच दिवसांपूर्वी अण्णा हजारे यांनी उपोषण करण्याच्या निर्णय घेतला होता. यावेळी राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची भेट घेऊन केंद्र सरकार अर्थसंकल्पातून शीतगृहांसाठी 5 हजार कोटींची तरतूद करेल असे आश्वासन दिले होते. ती शीतगृहे कुठे आहेत? कुठे आहेत त्या घोषणा? असे म्हणत आजचे बजेट ऐकल्यानंतर अण्णा हजारे यांचे उरलेले समर्थक असतील तर त्यांनाच शीतगृहात ठेवण्याची वेळ आल्याची टीका सुद्धा राजू शेट्टी यांनी केली आहे.