कोल्हापूर - शेतीला दिवसा दहा तास वीज मिळावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कोल्हापूर महावितरण कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरु आहे. मागील बारा दिवसांपासून सुरु असणाऱ्या या आंदोलनाकडे राज्य सरकारने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी सर्व विधी पार पाडत सरकारचे 12 वे घालत, मुंडण आंदोलन केले आहे. तसेच, गोडाचा नैवैद्य तयार करुन सरकार विरोध घोषणाबाजी केली ( Swabhimani Shetkari Sanghatana Agitation Kolhapur ) आहे.
याबाबात बोलताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले की, लोकांमध्ये थोडी जरी अस्वस्थता जाणवली तर त्यांचे म्हणणे ऐकून घेणे आणि त्यावर उपाययोजन करणे सरकारचे काम आहे. मात्र, गेल्या 12 दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाकडे लक्ष नसल्याने सरकार असंवेदनशील झाले आहे. सरकार शेतकऱ्यांचे ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. सरकारची कोणतीच संवेदना दिसत नसल्याने आज बारावे घालण्यात आले आहे. आता तरी सरकारच्या आत्मास शांती मिळेल, असा टोलाही राजू शेट्टी यांनी लगावला आहे.