महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पंचगंगा नदी प्रदूषण : शिरोळ बंधाऱ्यात हजारो मासे मृत्युमुखी; स्वाभिमानीचे कार्यकर्ते आक्रमक - पंचगंगा नदी प्रदूषण आंदोलन

पंचगंगा नदी प्रदूषण
पंचगंगा नदी प्रदूषण

By

Published : Feb 10, 2021, 5:04 PM IST

15:50 February 10

पंचगंगा नदी प्रदूषण : शिरोळ बंधाऱ्यात हजारो मासे मृत्युमुखी; स्वाभिमानीचे कार्यकर्ते आक्रमक

शिरोळ बंधाऱ्यात हजारो मासे मृत्युमुखी; स्वाभिमानीचे कार्यकर्ते आक्रमक

कोल्हापूर- शिरोळ बंधाऱ्यात गेल्या 4 दिवसांपासून हजारो मासे मृत्युमुखी पडत आहेत. त्यामुळे पंचगंगा नदी प्रदूषणाचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुद्धा याबाबत काही दिवसांपूर्वी बैठक घेऊन प्रदूषणास जबाबदार घटकांवर कारवाई करा, असे आदेश दिले होते. मात्र, तरीही प्रदूषणाचे प्रमाण काही केल्या कमी होताना दिसत नाही. म्हणूनच आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून आज थेट बंधाऱ्यात उतरून आंदोलन करण्यात आले. शिवाय लवकरात लवकर संबंधितांवर कारवाई झाली नाही तर यापेक्षा तीव्र आंदोलन करू असा इशारा आंदोलकांनी दिला. त्यामुळे आता याकडे प्रदूषण नियंत्रण मंडळ लक्ष देणार का? हेच पाहावे लागणार आहे. 

प्रदूषण नियंत्रण मंडळाचे दुर्लक्ष - 

पंचगंगा प्रदूषण मुक्तीसाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुद्धा लक्ष घातले असून काही दिवसांपूर्वी मुंबईमध्ये याबाबत बैठक सुद्धा घेण्यात आली होती. शिवाय प्रदूषणास जबाबदार असणाऱ्या सर्व घटकांवर कारवाई करा तसेच उद्योगांना टाळे लावा, अशा सूचना सुद्धा देण्यात आल्या आहेत. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली जात असल्याचे स्थानिकांनी म्हटले आहे. आदेश निघाल्यानंतर केवळ 2-3 दिवस कारवाईचे नाटक केले जाते. मात्र, पुन्हा प्रदूषण करायचे तसे केले जाते असेही आंदोलकांनी म्हटले असून आता कडक कारवाई केली जात नाही, तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नसल्याचे सुद्धा स्थानिक नागरिकांसह स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी म्हटले आहे.     

संतप्त नागरिकांनी नदीमध्ये उतरून केले आंदोलन -

दुषित पाण्यामुळे शेतीबरोबर नागरिकांनाही विविध आजारांना तोंड द्यावे लागत आहे. नदी दुषित करणार्‍या घटकांवर तत्काळ कारवाई व्हावी, झोपेचे सोंग घेतलेल्या प्रदूषण नियंत्रण मंडळाला जाग यावी, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आज शिरोळमधील पंचगंगा नदीमध्ये उतरून आंदोलन केले शिवाय प्रदूषणास जबाबदार घटकांसह प्रदूषण नियंत्रण मंडळाविरोधात तीव्र घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली. 

ABOUT THE AUTHOR

...view details