कोल्हापूर- दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कार्यकर्त्यांसोबत 'रात्रभर आत्मक्लेश जागर' आंदोलन करण्यात येणार आहे. हे आंदोलन 3 डिसेंबरला रात्री 8 वाजल्यापासून 4 डिसेंबरला सकाळपर्यंत सुरू राहणार आहे. या आंदोलनात राजू शेट्टीही सहभागी होणार आहेत.
दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला केंद्र सरकार दाद देत नसल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आक्रमक झाले आहेत. ते स्वत: रात्रभर जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आत्मक्लेश जागर आंदोलनात सहभागी होणार आहेत.
स्वाभिमानीचे रात्रभर आत्मक्लेश जागर आंदोलन राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर होणार जागर आंदोलनराजू शेट्टी म्हणाले की, केंद्र सरकारने देशातील शेतकऱ्यांवर तीन कृषी कायदे लादले आहेत. हे कायदे अन्यायी असून शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारे आहेत. दिल्लीमध्ये 7 दिवसापासून कडाक्याच्या थंडीत देशभरातील शेतकरी कुडकुडत बसले आहेत. तरीही केंद्र सरकार केवळ वेळकाढूची भूमिका घेत आहेत. त्या शेतकऱ्यांना पाठिंबा म्हणून राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे जागर आंदोलन करण्यात येणार आहे.
हेही वाचा-LIVE: दिल्लीत शेतकरी रस्त्यावर... 5 डिसेंबरला देशव्यापी आंदोलन पुकारणार
भजन आणि कीर्तन सुद्धा केली जाणार -
उद्या 3 डिसेंबरला रात्री पिठले भाकर खाऊन जागर आंदोलनाला सुरूवात केली जाणार आहे. रात्रभर भजन आणि किर्तन केले जाणार आहे. केंद्र सरकारला सद्बुद्धी दे व शेतकऱ्यांना न्याय मिळू दे, या मागणीसाठी आत्मक्लेश जागर आंदोलन केले जाणार आहे.
हेही वाचा-हरयाणा पोलिसांची दडपशाही, दिल्लीला जाण्यापूर्वीच शेतकऱ्यांचे अटकसत्र
राजकारण्यांनीसुद्धा आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन
ज्यांना खरेच शेतकऱ्यांचे प्रश्न सुटावेत असे मनापासून वाटत आहे. त्या सर्वांनी या जागर आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन शेट्टींनी केले आहे. राजकारण्यांनीसुद्धा आंदोलनात सहभागी व्हा, असेही त्यांनी म्हटले आहे. रात्री 12 वाजल्यापासूनच या आंदोलनाला पाठिंबा द्यायला या. तरच तुमची भावना आम्ही प्रामाणिक समजू असेही शेट्टींनी म्हटले आहे.
दरम्यान, दिल्लीतील आंदोलनात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांनी पाच डिसेंबरला संपूर्ण देशभरात आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. या आंदोलनात कॉर्पोरेट हाऊसेसच्या विरोधात निदर्शने करण्यात येणार आहेत. तसेच यावेळी प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन होणार आहे.