कोल्हापूर- राज्यपाल कोट्यातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना आमदारकी देण्याची शरद पवारांनी घोषणा केल्यानंतर स्वाभिमानी पक्षातूनच टीका व्हायला सुरुवात झाली होती. राजू शेट्टी यांचे खंदे कार्यकर्ते समजले जाणारे राज्याचे अध्यक्ष प्रा. जालंदर पाटील आणि सावकार मादनाईक या घरच्या व्यक्तींनीच शेट्टींवर टीका करत नाराजी व्यक्त केली होती. मात्र या नाराजी नाट्यावर शुक्रवारी रात्री उशिरा पडदा पडला आहे. शेट्टी यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना ज्या पद्धतीने म्हटले होते, हे केवळ पेल्यातील वादळ आहे, दोन दिवसांत शांत होईल. त्याच पद्धतीने हे वादळ आता शांत झाले असून सर्वजण पुन्हा एकत्र आल्याचे पाहायला मिळाले.
शुक्रवारी रात्री उशिरा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नाराज पदाधिकारी आणि शेट्टी यांची गळाभेट झाली. आमच्यामध्ये जे गैरसमज निर्माण झाले ते सर्व संपले आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटना एकसंघ होती व नेहमीच एकसंघ राहिल. शिवाय आम्ही सर्वजण शेतकरी हिताशी बांधील आहोत. आमच्यामध्ये आता कसेलेही मतभेद उरले नाहीत. आम्ही सर्वजण एकदिलाने, एकजुटीने व एकमताने चळवळीचे काम करू, असा मजकूर लिहलेले पत्रक स्वामिमानीने काढून स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता या पत्रकावरून शेट्टी यांचा विधानपरिषदेचा मार्ग मोकळा झाला आहे, असे म्हणायला काही हरकत नाही.
'ईटीव्ही भारत'चेच वृत्त खरे ठरले -
राजू शेट्टी यांनी आपल्याच कार्यकर्त्यांकडून टीका झाल्यानंतर विधानपरिषदेची ब्यादच नको, असे आपल्या फेसबुक पोस्टद्वारे स्पष्ट केले होते. सर्वत्र अखेर राजू शेट्टींनी उमेदवारी नाकारली अशा आशयाच्या बातम्या आल्या, मात्र 'ईटीव्ही भारत'ला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये त्यांनी हे फक्त पेल्यातील वादळ आहे आणि दोन दिवसांत शांत होईल, असे म्हटले होते. अशीच बातमी आम्ही प्रसिद्ध केली. शिवाय यामध्ये हे सर्व नाराजीनाट्य दोन दिवसात शांत होईल, असेही शेट्टींनी म्हटले होते.