कोल्हापूर - हे फक्त पेल्यातील वादळ आहे. ते लवकरच मिटेल, असा विश्वास स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी व्यक्त केला. ते 'ईटीव्ही भारत'सोबत बोलत होते.
पक्षातील अंतर्गत वादावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष यांनी 'ईटीव्ही भारत'सोबत संवाद साधला. राज्यपाल कोट्यातून राजू शेट्टी यांना आमदारकी देण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी घोषणा केली होती. यानंतर शेट्टी यांच्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेमधूनच टीका व्हायला सुरुवात झाली आहे. पक्षातीलच खंदे कार्यकर्ते शेट्टींच्या निर्णयावर नाराज झाल्याचे पाहायला मिळत आहे. संघटनेचे प्रदेशाध्यक्ष जालंधर पाटील आणि नुकतीच शिरोळ विधानसभा निवडणूक लढवलेले सावकार मादनाईक या दोघेही शेट्टी यांच्या निर्णयावर नाराज झाले. वर्षानुवर्ष संघटनेत काम केलेल्या कार्यकर्त्याला संधी द्यायला हवी होती, त्यांनी म्हटले आहे. याबाबत राजू शेट्टी यांनी हे फक्त पेल्यातील वादळ आहे. ते लवकरच मिटेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
हेही वाचा -बांधावर बियाणे पोहोचलेच नाही, दुकानातही तुटवडा; पाऊस पडूनही आम्ही पेरावं की नाही?
संघटनेतील कार्यकर्त्यांचा प्रश्न आहे की आम्हाला संधी द्यायला हवी होती. याबाबत शेट्टी म्हणाले, मी सकाळीच फेसबुकद्वारे माझ्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यामध्ये मी स्पष्टपणे नमूद केले आहे. कार्यकर्त्यांनीच निर्णय घेऊन माझे नाव पुढे केले होते आणि हाच निरोप घेऊन मी शरद पवार यांना भेटलो. त्यामुळे याबाबत आणखी काहीही बोलणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
एकीकडे स्वाभिमानीतील कार्यकर्त्यांकडून टीका होत असली तरी तिकडे सदाभाऊ खोत यांनी मात्र शेट्टींबाबत चांगली प्रतिक्रिया देत शेट्टींचे अभिनंदन केले पाहिजे, असे म्हटले आहे. याबाबत विचारले असता पुतना-मावशीच्या दुधावर माझा विश्वास नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, आता संघटनेतील कार्यकर्ते शेट्टींच्या म्हणण्यानुसार शांत होतात की ते संघटनेला सोडचिठ्ठी देतात? हे आता येणाऱ्या काळात पाहावे लागणार आहे.