कोल्हापूर -कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सरकारने १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन घोषित केला आहे. त्यामुळे राज्यात संचारबंदी आणि जमावबंदी लागू आहे. मात्र, आरोग्य राज्यमंत्री अध्यक्ष असलेल्या साखर कारखान्याच्या कार्यकारी संचालकानेच या संचारबंदीचे उल्लंघन केल्याचे उघडकीस आले आहे.
आरोग्य राज्यमंत्री अध्यक्ष असलेल्या साखर कारखान्याच्या एमडीनेच केले संचारबंदीचे उल्लंघन! - कोल्हापूर साखर कारखाना
कोरोनामुळे राज्यात संचारबंदी आणि जमावबंदी लागू आहे. मात्र, आरोग्य राज्यमंत्री अध्यक्ष असलेल्या साखर कारखान्याच्या कार्यकारी संचालकानेच या संचारबंदीचे उल्लंघन केल्याचे उघडकीस आले आहे.
कोरोनो विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण राज्यात संचारबंदी लागू आहे. मात्र, असे असतानाही हातकणंगले तालुक्यातील नरंदे येथील शरद सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक संतोष डिग्रजे यांनी ऊस तोडणी कामगारांना गावी जाण्यास परवानगी देवून संचारबंदीचे उल्लंघन केले. याप्रकरणी त्यांच्यावर हातकणंगले पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत प्रादेशिक साखर कार्यालयाचे उपसंचालक एस. एन. जाधव यांनी हातकणंगले पोलिसात तक्रार दिली. संतोष डिग्रजे यांनी कारखान्याच्या लेटर पॅडवर मजूर रामकिसन भगवान वायनसे (रा. नामेवारी ता. केज जि. बीड) हे कारखान्याकडील गळीत हंगाम २०१९-२०२० ऊस तोडणी वाहतूक पूर्ण झाल्याने गावी जात आहेत. त्यांना गावी जाण्यासाठी परवानगी दिलेली आहे. त्यांना जाण्यासाठी अडथळा करू नये, अशा आशयाचे पत्र दिले. याद्वारे त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केले. त्यामुळे डिग्रजे यांच्यावर हातकणंगले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आहे.