कोल्हापूर- शिरोळ तालुक्यात गुरूवारी रात्री झालेल्या वादळी वारा आणि पावसाने ऊसतोड मजुरांची अक्षरशः दैना उडाली. कारखाना परिसरात राहणाऱ्या मजुरांच्या यामध्ये शंभरहुन अधिक झोपड्या जमीनदोस्त झाल्या. उरले सुरले धान्य भिजले, अन्नात पाणी साचले. अंथरून पांघरून भिजले. या हलाखीच्या परिस्थितीमुळे या कामगारांनी आता आम्हाला गावाकडे सोडा अशी मागणी केली आहे.
येथील दत्त कारखान्याच्या परिसरात सुमारे 2 हजार ऊसतोड मजूरांचे वास्तव्य आहे. कारखान्याने सर्व प्रकारची सोय, सुविधा उपलब्ध करून दिली आहे. मात्र गुरुवारी झालेल्या वादळी पावसाने सर्व काही अस्ताव्यस्त करून टाकले. यामध्ये जवळपास शंभर झोपड्या पडल्या, त्यात एक महिला जखमी सुद्धा झाली. दररोजच असे पावसाचे वातावरण होत आहे. मग आम्ही राहायचं कुठं असा सवाल करत घाबरलेल्या मजुरांनी आम्हाला घरी सोडा, अशी मागणी केली.