कोल्हापूर - भाजीपाल्याची राणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भेंडीला जगभरातच मोठी मागणी असते. आपण याआधी हिरवी, पांढरी भेंडी पाहिली आहे. मात्र, कोल्हापूरमधल्या एका शेतकरी महिलेने चक्क 'लाल भेंडी'चे यशस्वी उत्पादन घेतले आहे. त्यामुळे हिरव्या भेंडीबरोबरच आता लाल भेंडी सुद्धा खाता येणार आहे.
20 वर्षांच्या शेती अनुभवाच्या जोरावर घेतले लाल भेंडीचे उत्पादन -
कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुका हा भाजीपाल्याच्या उत्पादनात देशात अग्रेसर आहे. येथून अल्ल, टोमॅटो, मिरची, वांगी, शिमला मिरची, शेवंती, पेरू यासह विविध भाजीपाला देशातल्या मोठमोठ्या शहरातील बाजारपेठेत जातात. त्यामुळे इथले शेतकरी सातत्याने आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शेती करताना पाहायला मिळतात. हेच वेगळेपण जोपासत शिरोळ तालुक्यातील कोंडीग्रे गावच्या कुसूम बोरगावे या शेतकरी महिलेने श्रीवर्धन बायोटेकमधील 20 वर्षाच्या अनुभवाच्या जोरावर जिल्ह्यात पहिल्यांदाच कुमकुम जातीच्या लाल भेंडीचा यशस्वी प्रयोग केला आहे. आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा या भेंडीचे अनेक फायदे असल्याचे त्या सांगतात.
अशा' पद्धतीने केले शेतीचे नियोजन -
सुरुवातीला बोरगावे यांनी 5 गुंठे क्षेत्रात हा प्रयोग केला होता. यात ही भेंडी आरोग्याच्या दृष्टीने फायदेशील असल्याचे तपासणीतून पुढे आले. त्यामुळे त्यांनी आता तब्बल अर्धा एकर क्षेत्रावर ही लाल भेंडी फुलवली आहे. बोरगावे यांनी माळ भागावरील शेतात दोन बेडमध्ये साडे चार फूट अंतर ठेवून सव्वा फूट अंतरावर भेंडी रोपांची लागण केली आहे. अर्धा एकर क्षेत्रात आठ हजार रोपांची लागण केली असून त्यांना दररोज ड्रीपने 20 मिनिटे पाणी दिले जाते. शिवाय कीटकनाशकांचा सुद्धा गरजेनुसार वापर केला जातो.
80 ते 100 रुपयांपर्यंत मिळतोय दर -
त्यांची ही लाल भेंडी कोल्हापूर, सांगली, गोवा, मुंबई, दादर यासह विविध बाजारपेठांत सद्या जात असून त्याला सुरुवातीलाच तब्बल 80 ते 100 रूपयांपर्यंत दर मिळत आहे. सद्या दररोज 40 ते 50 किलोपर्यंत उत्पादन मिळत असल्याचे बोरगावे यांनी म्हटले आहे. त्यांच्या या यशस्वी प्रयोगाची जिल्ह्यात सर्वत्र चर्चा सुरू असून अनेकजण आता त्यांच्याकडून मार्गदर्शन सुद्धा घेत आहेत.