महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पन्हाळा तालुक्यातील 'या' गावात भर उन्हात शिक्षण घेताहेत विद्यार्थी - school building problem news

या शाळेच्या कामगिरीबाबत जिल्ह्यात नावलौकिक आहे, मात्र आता इमारातच धोकादायक बनल्याने नाईलाजाने मुलांना भर उन्हात बसवावे लागत आहे. त्यामुळे संबंधितांनी याकडे लवकरात लवकर लक्ष द्यावे अशी मागणी होऊ लागली आहे.

kolhapur
kolhapur

By

Published : Feb 9, 2021, 3:16 PM IST

Updated : Feb 9, 2021, 3:29 PM IST

कोल्हापूर - शाळेची संपूर्ण इमारतच धोकादायक बनल्याने आता भर उन्हात विद्यार्थी शिक्षणाचे धडे गिरवत आहेत. पन्हाळा तालुक्यातील चव्हाणवाडीमधील केंद्रशाळेत हे घडत असून गावकरी आणि परिसरातील नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. खरेतर या शाळेच्या कामगिरीबाबत जिल्ह्यात नावलौकिक आहे, मात्र आता इमारातच धोकादायक बनल्याने नाईलाजाने मुलांना भर उन्हात बसवावे लागत आहे. त्यामुळे संबंधितांनी याकडे लवकरात लवकर लक्ष द्यावे अशी मागणी होऊ लागली आहे.

शाळेत पहिली ते सातवी पर्यंतचे वर्ग

चव्हाणवाडी गावातील या केंद्र शाळेत पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग भरतात. या केंद्रशाळेअंतर्गत 12 जिल्हा परिषद शाळा आणि दोन माध्यमिक शाळा संलग्न आहेत. शाळेच्या जुन्या इमारतीत पाच खोल्या आहेत. त्यातील सर्वच खोल्यांच्या भिंतींना मोठे मोठे तडे गेले आहेत, तर काही खोल्यांमध्ये छत लोंबकळत असल्याचे पाहायला मिळत आहे. संपूर्ण इमारतच धोकादायक बनली असल्याने शासनाकडून दुरुस्तीचे आदेशसुद्धा देण्यात आले आहेत. त्यामुळे नाईलाजाने मुलांना सावली शोधून झाडाखाली बसवावे लागत आहे. इमारत पाडण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दीड वर्षांपूर्वी एक पत्र देऊनदेखील शाळा लिलाव प्रक्रिया रखडल्याने निर्लेखन अपूर्ण आहे. त्यामुळे शाळेसाठी एकही खोलीत अद्याप मंजूर झालेली नाही.

ग्रामस्थांकडून वेळोवेळी पाठपुरावा

चव्हानवाडी गावातील या प्राथमिक शाळेबाबत ग्रामस्थांनीसुद्धा वेळोवेळी इमारतीसाठी मागणी केली आहे. लोकप्रतिनिधींना याबाबत कळवले आहे. मात्र याकडे लोकप्रतिनिधींनीच दुर्लक्ष केल्याचे स्थानिक सांगतात. त्यामुळे लवकरात लवकर शाळेची इमारत पूर्ण व्हावी आणि विद्यार्थ्यांना हक्काच्या चार भिंतींमध्ये शिक्षण घेता यावे, अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत. गावाच्या सरपंच सुवर्णा चव्हाण यांनी लोकप्रतिनिधींशी याबाबत चर्चा केली आहे. त्यामुळे आता तरी तांत्रिक गोष्टीवर वेळ न घालवता याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी केली आहे.

Last Updated : Feb 9, 2021, 3:29 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details