महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जनावरांच्या गोठ्यामध्येच सुरू केला छोटा कारखाना; कोल्हापुरातील तरुणाची कमाल..! - कोल्हापुरात गोठ्यामध्ये कारखाना

टाळेबंदीमुळे अनेकांचे व्यवसाय बुडाले तर अनेकांच्या नोकऱ्याही गेल्या. मात्र, कोल्हापुरातील एका तरुणाने याकडे संधीच्या रूपाने पाहून आपल्या जनावरांच्या गोठ्यामध्येच एक छोटा कारखाना सुरू केला. गावातील 3 तरुणांना या व्यवसायाच्या माध्यमातून नोकरीसुद्धा त्याने दिली आहे. कोण आहे हा तरुण आणि कशा पद्धतीने त्याने जनावरांच्या गोठ्यामध्ये हा व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला पाहुयात 'ईटीव्ही भारत'च्या या विशेष बातमीमधून...

कोल्हापूर
कोल्हापूर

By

Published : Feb 17, 2021, 10:40 PM IST

कोल्हापूर- पन्हाळा तालुक्यातील कोतोली या गावातील संतोष पाटील याने 2016 साली मेकॅनिकल अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्याने कोल्हापुरातील एका कंपनीमध्ये नोकरी केली. काही दिवसातच त्याला बंगळुरूमधील एका कंपनीमध्ये नोकरीची संधी भेटली. गेल्या तीन-साडेतीन वर्षांपासून तो या क्षेत्रात नोकरी करत आहे. मात्र, कोरोनामुळे टाळेबंदी करण्यात आली आणि घरातून काम (वर्क फ्रॉम होम) सुरू झाले. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून तो घरातूनच काम करतोय. याच दरम्यान आपल्याला गावात खूप मोकळा वेळ मिळतोय आणि गावातील अनेक जणांना आपण एखाद्या व्यवसायातून रोजगार देऊ शकतो हा विचार त्याच्या मनात आला. त्यानंतर गावातच असलेल्या आपल्या जनावरांच्या गोठ्यामध्ये त्याने एक छोटासा कारखाना सुरू केला.

कोल्हापूर

नवीनच बांधकाम केलेल्या गोठ्यामध्ये आपल्याला पुरेशी जागा भेटू शकते म्हणून त्याने हा निर्णय घेतला आणि त्याच्या घरच्यांनी सुद्धा त्याला याच्यासाठी परवानगी दिली. गेल्या 3 महिन्यांपासून तो याठिकाणी व्यवसाय चालवत आहे. हिम्मत कारंडे ऑपरेशन हेड म्हणून आता तिथले सगळे काम पाहतात. संतोषने ज्या शाळेमध्ये पाचवी ते दहावी पर्यंतचे शिक्षण घेतले, त्या नेहरू विद्यालयासमोरच असलेल्या गोठ्यामध्ये हा व्यवसाय सुरू केला. त्याच्या या व्यवसायासाठी सर्वच शिक्षकांनी शुभेच्छा दिल्या आहेत. शिवाय आपल्या विद्यार्थ्याचा नवीन प्रयोग पाहून त्यांना अभिमान वाटतो

कोणकोणती यंत्रे बनवली ?

त्यांनी आजपर्यंत या ठिकाणी ठिबक सिंचनची पाईप गुंडाळण्याचे यंत्र (ड्रीप पाईप वाईंडर), कडबा कुट्टी यंत्र (चाफ कटर), ठिबक सिंचनचे पाणी स्वच्छ करण्याचे यंत्र (सॅण्ड फिल्टर) आदी यंत्र बनविलेली आहेत. भविष्यात दूध काढणी यंत्र सुद्धा बनविणार असल्याचे त्याने म्हटले आहे. विशेष म्हणजे ही सर्व यंत्रे बाजारभावापेक्षा खूप कमी किंमतीमध्ये नागरिकांना उपलब्धता करून दिली आहेत. सद्या त्याच्या या वर्कशॉपची परिसरात चर्चा सुरू आहे.

गावातीलच तरुणांना उपलब्ध झाली नोकरीची संधी

या छोट्या कारखान्यात सद्या 3 जण काम करतात. यामध्ये त्याने गावातील आयटीआयचे शिक्षण घेतलेल्या तीन तरुणांना नोकरी दिली आहे. भविष्यात आणखी काही जणांना नोकरीची संधी उपलब्ध होणार असल्याचेही त्याने म्हटले आहे. दरम्यान, गावातील मुले सुद्धा गावातच नोकरी मिळाल्याने आनंदी आहेत. याच नोकरीसाठी त्यांना शहरात जावे लागणार होते. त्यांचा हा त्रास कमी झाला आहेच शिवाय याठिकाणी आणखी काही गोष्टी शिकायला सुद्धा भेटत आहेत.

काहीतरी करायची जिद्द आणि चिकाटी असेल तर काहीही अशक्य नाही -

आयुष्यात आपण काहीही करताना स्व:तावर विश्वास असायला हवा. शिवाय नेहमी काहीतरी वेगवेगळे करायची धडपड आणि जिद्द असायला हवी. असे असल्यास कोणतीही गोष्ट अशक्य नाही. शिवाय अनेकांनी गोठ्यात व्यवसाय सुरू करण्याचा विचार सुद्धा मनात आणला नसता. मात्र, काहीतरी करायची धडपड असेल तर नक्कीच त्यामध्ये यश येते हे यामधून संतोषने दाखवून दिले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details