कोल्हापूर - केंद्र सरकारने शेतकऱ्यांवर लादलेले तीन कृषी कायदे त्वरित रद्द करण्यासाठी ग्रामसभेमध्ये ठराव करून राष्ट्रपती, पंतप्रधान आणि सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहचविण्यासाठी राज्यातील ग्रामपंचायतींच्या गेल्या वर्षभरापासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद केलेल्या ग्रामसभा पुन्हा सुरू करण्याची परवानगी देण्यात यावी. यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेऊन निवेदन दिले.
ग्रामपंचायतींमधून ठराव गेल्यानंतर केंद्र सरकारला दाहकता समजेल
राजू शेट्टी म्हणाले की, राज्यातील कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षीपासून ग्रामपंचायतींना ग्रामसभा घेण्यास मनाई करण्यात आलेली आहे. सध्या राज्यातील कोरोनाचा प्रभाव कमी होऊन सर्वत्र लॉकडाऊन खुले झाले असून जवळपास सर्वच कार्यक्रम सुरू आहेत. धार्मिक, सांस्कृतिक, लग्न आदी कार्यक्रम मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. शाळा, कॉलेजना देखील परवानगी देण्यात आलेली आहे. मात्र, ग्रामपंचायतींना अद्यापही ग्रामसभा, तसेच मासिक बैठका घेण्यास परवानगी देण्यात आलेली नाही.
हेही वाचा -ईटीव्ही भारत विशेष : कोल्हापुरातल्या 'ओपन फ्रीज'मुळे मिटतेय अनेकांची भूक
गेल्या 2 महिन्यापासून दिल्लीत लाखो शेतकरी कृषी कायदे रद्द करा, या मागणीसाठी ठिय्या मारून बसले आहेत. देशात सर्वत्र मोठ्या प्रमाणात आंदोलने सुरू आहेत. केंद्र सरकारने शेतकर्यांना अजिबात दाद दिलेली नाही. महाराष्ट्रात देखील मोठ्या प्रमाणात आंदोलने सुरू आहेत. सर्वच ग्रामपंचायतींना या कायद्यांच्या विरोधात ठराव करायचे आहे. त्यातून परिस्थितीची दाहकता केंद्र सरकारपर्यंत जाईल, असे शेट्टी म्हणाले.