कोल्हापूर -सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांनी आझाद मैदानातील संप मागे घेत असल्याचे म्हंटले आहे. शिवाय एसटी कर्मचाऱ्यांनी सरकारने जाहीर केलेल्या पगारवाढी बाबत निर्णय घ्यावा आणि आपली भूमिका ठरवावी असे म्हटले आहे. त्यामुळे कोल्हापुरातील एसटी कर्मचारी मात्र आता संतप्त झाले असून त्यांच्या या भूमिकेवर नाराज झाले आहेत. एव्हढेच नाही तर, कोणत्याही परिस्थितीत संप मागे घेणार नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे. यावेळी कोणीही कर्मचारी कामावर हजर राहणार नाही अशी सार्वजनिक शपथ सुद्धा कर्मचाऱ्यांनी घेतली.
पगार वाढ नको, शासनात विलीनीकरण करा -
दरम्यान, काल एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटेल अशी शक्यता होती. मात्र परिवहनमंत्री अनिल परब यांनी पगारवाढीची घोषणा केली त्यावर कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. शिवाय आम्हाला पगार वाढ नको तर शासनात विलीनीकरण करा अशी मागणी या कर्मचाऱ्यांनी केली आहे. याबाबत कोल्हापुरातील बसस्थानक परिसरात कर्मचाऱ्यांनी पुन्हा ठिय्या मांडला आहे. जोपर्यंत विलीनीकरण होत नाही तोपर्यंत आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम बसणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.