कोल्हापूर - जिल्हा परिषदेच्या मान्यताप्राप्त दिव्यांग आणि गतिमंद मुलांच्या शाळांमध्ये दिवाळीसाठी आकर्षक आकाश कंदिल, रंगीबेरंगी पणत्या, उटणे, मेणबत्त्या यांच्यासह भेटवस्तू तयार करण्यात गुंतली आहेत. यंदाच्या गिफ्ट पॅकमध्ये साबण-तेलांसोबतच सॅनिटायझरच्या बाटलीचाही समावेश झाला आहे. बनवलेल्या वस्तू, स्पेशल ऑलिम्पिक, आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील सहभाग पाहून पंखाविना भरारी काय असते, ते या विद्यार्थ्यांनी दाखवून दिले आहे. पाहुयात, 'ईटीव्ही भारत'च्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्यातील विविध शाळा आणि त्या ठिकाणी दीपावलीचे साहित्य बनविण्याची सुरू असलेली लगबग...
चेतना विकास मंदिर - विद्यार्थ्यांचे वर्क फ्रॉम होम
चेतना विकास मंदिरात कागदाच्या लगद्यापासून इको फ्रेंडली गणेश मूर्ती बनवल्या जातात. याठिकाणी तेलाचा घाणा सुरू आहे. दरवर्षी, या एका केंद्राद्वारे 50 हजार पणत्या, 12 हजार आकाश कंदिल, 5 हजार लक्ष्मीपूजनासाठी डबाबंद सामग्रीची दिवाळीच्या निमित्ताने विक्री होते. यामधून 15 लाखांपर्यंतची उलाढाल होत असते. मात्र, यावर्षी लॉकडाऊनमुळे दिवाळीचे साहित्य मुलांकडून घरातून करून घेतले आहे. आतापर्यंत घरातून 25 हजार पणत्या रंगवून आलेल्या आहेत. तसेच जवळपास अडीच हजार आकाश कंदिल तयार करून घेण्यात आलेले आहेत. विशेष म्हणजे, यावेळच्या गिफ्ट बॉक्समध्ये सॅनिटायझरच्या बाटलीचाही समावेश करण्यात आला आहे.
स्वयंम मतिमंद शाळा - विद्यार्थ्यांच्या पेंटिंग्जचे प्रदर्शन
इंडियन रेड क्रॉस सोसायटी संचलित स्वयंम मतिमंद शाळेतील उद्योग केंद्राच्या अध्यक्ष शोभा तावडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या शाळेतील उद्योग केंद्रात 18 वर्षांपुढील 56 मुले आहेत. याठिकाणी अत्यंत सुंदर पद्धतीने गणेश मूर्ती आणि वेगवेगळी फुले तयार केली जातात. यावेळी दिवाळीसाठी उपयोगी असणाऱ्या वस्तूंचे बॉक्स तयार करण्यात येत आहे. याठिकाणी फाइल तयार करण्यात येत आहेत. शिवाय पेंटींगचे प्रदर्शनही भरवण्यात येत असते. दुर्लक्षित असणाऱ्या या मुलांना आमच्या संस्थेमार्फत सक्षम करण्यात येते. त्यामुळे या वस्तूंची खरेदी करावी, असे आवाहनही शोभा तावडे यांनी केले आहे.
जिज्ञासा विकास मंदिर - मुलांना सतत कार्यरत ठेवलं जातं
बौध्दिक अक्षम मुलांच्या शाळेत अत्यंत आकर्षक आकाश कंदिलाची निर्मिती होत आहे. या शाळेच्या स्मिता दीक्षित म्हणाल्या, मेणपणत्या मुले सुंदर रंगवतात. वजनानुसार उटण्याचे पॅकिंग करतात. शिवण विभाग, पाक विभागातही या मुलांना वेगवेगळ्या पद्धतीचे प्रशिक्षण दिले जाते. मुलांसाठी व्यायामशाळा देखील आहे. मुलांना सतत कार्यरत ठेवले जाते.