महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Aug 9, 2020, 6:58 PM IST

ETV Bharat / state

EXCLUSIVE REPORT : गेल्या वर्षी, याच दिवशी... कोल्हापुरातील महाप्रलयाच्या पाऊलखुणा... (भाग 2)

प्रत्यक्षात बचावकार्य सुरू झाल्यापासून पुढे आठ दिवस नेमकी कोणती आव्हाने होती आणि त्याचा कशा पद्धतीने सर्वांनी सामना केला यावर एक नजर... 

कोल्हापूरचा महाभयानक पूर
कोल्हापूरचा महाभयानक पूर

कोल्हापूर - गेल्या वर्षी कोल्हापूर जिल्ह्याला आजवरच्या सर्वात मोठ्या आस्मानी संकटाला सामोरे जावे लागले. आजवर कधीही एवढे मोठे संकट कोल्हापूवर आले नव्हते. या संकटाने होत्याचे नव्हते झाले, हजारो संसार उद्ध्वस्त झाले, ऑगस्ट महिन्यातील ते 15 दिवस कोणीही कधी विसरू शकणार नाही. त्या संकटाच्या जखमा इतक्या खोलवर आहेत की, आयुष्यभर त्या तशाच राहतील.

कोल्हापूरसह राज्यभरातील लोकांनी केलेल्या निस्वार्थी मदतीमुळे कोल्हापूर त्या संकटातून पुन्हा उभे राहिले. महाप्रलयावेळी काय होती परिस्थिती? कशा पद्धतीने पाणी पातळी वाढत गेली हे आपण मागच्या भागात वाचले. आता जेव्हा प्रत्यक्षात बचावकार्य सुरू झाल्यापासून पुढे आठ दिवस नेमकी कोणती आव्हाने होती आणि त्याचा कशा पद्धतीने सर्वांनी सामना केला यावर एक नजर...

8 ऑगस्ट 2019 :पूरस्थिती अजूनही अतिशय भयंकर होती. राधानगरी धरणातून 13 हजार 112 क्यूसेक पाण्याचा विसर्ग अद्याप सुरू होता. सकाळी 8 वाजता पाणीपातळी 54.8 फुटांवर पोहोचली होती. दादा माझे कुटुंब परवापासून पुरात आहे. माझे हे, माझे ते पुरात अडकले आहेत, मदतीची गरज आहे, असे हजारो मॅसेज व्हाट्सअपवर अजूनही येत होते. अनेकांना अद्याप मदतीची गरज होती. शिरोळ तालुक्यातील नागरिकांना तर अधिकच मदतीची गरज होती. दुपारी 2 वाजून 35 मिनिटांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांचे पूरपरिस्थितीचा आढावा घेण्यासाठी कोल्हापुरात आगमन. शिवाजी पूल येथून पुराची पाहणी करून मुख्यमंत्र्यांनी स्थलांतरित लोकांच्या व्यवस्थेबाबत पाहणी केली. 8 ऑगस्ट सायंकाळी 6 पर्यंत कोल्हापूर शहरातील बाधित ठिकाणी 99 टक्के रेस्क्यू पूर्ण झाले होते. त्याच पद्धतीने हातकणंगलेमध्ये 100 टक्के, आंबेवाडी 100 टक्के आणि प्रयाग चिखली 80 टक्के रेस्क्यू ऑपरेशन पूर्ण झाले होते. मात्र, शिरोळ तालुक्यात अजूनही रेस्क्यू ऑपरेशन सुरू होते. रात्री 9 वाजता राधानगरी धरणाचे 2 दरवाजे बंद झाले. आता एका मुख्य दरवाजासह स्वयंचलित 5 दरवाजांमधून एकूण 11 हजार 412 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता. दिलासादायक गोष्ट म्हणजे पावसाचा जोर सुद्धा कमी झाला होता आणि पाणी पातळीमध्येही झपाट्याने घट व्हायला सुरुवात झाली. रात्री 10 वाजेपर्यंत पाणी पातळी दीड ते दोन फुटांनी कमी होत 53.6 फुटांवर आली. रात्रीपर्यंत एकूण 1 लाख 11 हजार 365 लोकांचे स्थलांतर करण्यात आले होते.


9 ऑगस्ट 2019 : राधानगरी धरणाचे आणखी 2 स्वयंचलित दरवाजे बंद होऊन सद्या मुख्य दरवाजा आणि 3 स्वयंचलित दरवाजांमधून 7 हजार 356 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता. सकाळी 7 वाजता पाण्याची पातळी सुद्धा कमी होऊन 52.10 फुटांवर आली होती. एका आठवड्यानंतर सकाळी 8 वाजता उन्हाची किरणे पाहायला मिळाली. आंबेवाडी आणि चिखली रेस्क्यू पूर्ण झाल्यानंतर सर्व बोटी शिरोळ आणि इतर पूरबाधित ठिकाणी पाठविण्यात आल्या. राष्ट्रीय महामार्ग बंद असल्यामुळे अनेक अत्यावश्यक सेवा जसे की गॅस, भाजीपाला, किराणा, धान्य, पेट्रोल डिझेल पुरवणारे ट्रक सुद्धा जिल्ह्यात येऊ शकत नव्हते. सर्वत्र टंचाई भासू लागली. मात्र जिल्हा प्रशासन प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींची अपडेट घेऊन मदत पोहोचवण्याचे प्रयत्न करत होते. यामध्ये एक गोष्ट सुद्धा आजही लक्षात राहील अशी आहे. निवासी उपजिल्हाधिकारी शिंदे यांना सीपीआर रुग्णालयात लहान बाळांना दुधाची गरज असल्याबाबत मॅसेज मिळाला आणि पुढच्या 15 मिनिटांमध्ये सीपीआरमध्ये दूध पोहोच झाले होते. विशेष म्हणजे लष्कर, एनडीआरएफ, एसडीआरएफ, नौदल, जिल्हा प्रशासन, लोकप्रतिनिधी, सेवाभावी संस्था, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, स्थानिक नागरिक हे सगळेच मिळेल त्या साधनाने आणि विविध मार्गांनी अडचणीत सापडलेल्या पूरग्रस्तांच्या मदतीला धावले होते. कुणी तराफ्यावरून, दोरीच्या साहाय्याने, प्लास्टिक खुर्चीच्या मदतीने तर कुणी प्लास्टिक बॅरेलच्या सहाय्याने पूरग्रस्तांना सुरक्षित स्थळी हलवून त्यांना मदत करत होते. याच दिवशी कोल्हापुरात पेट्रोलसाठी 2 किलोमीटरपर्यंत रांगा लागल्याचे पाहायला मिळाले. अलमट्टी धरणातून सुद्धा जवळपास 4 लाख 50 हजार क्यूसेकचा विसर्ग होऊ लागला आणि पाणी पातळी झपाट्याने कमी होऊ लागली. पूरग्रस्तांना मदतीचा ओघ सुरू झाला. मात्र, काही ठराविक ठिकाणीच मदत पोहोचू लागली. त्यामुळे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हास्तरीय पूरग्रस्त मदत सनियंत्रण कक्ष स्थापन केला. शिरोली मदरसाने जवळपास 600 लोकांच्या राहण्या-खाण्याची सोय केली. तत्कालीन परिवहनमंत्री दिवाकर रावते कोल्हापूर दौऱ्यावर.


10 ऑगस्ट 2019 : या दिवशी सुद्धा सकाळी 7 वाजता पाण्याची पातळी 52.2 फुटांवर होती. अजूनही महामार्गावर 4 फूट पाणी होते. शिरोळमध्ये जवळपास 45 बोटींच्या माध्यमातून अजूनही बाचावकार्य आणि मदतकार्य सुरू होते. दुपारी साडे तीन वाजता विशाखापट्टणम येथून आणखी 15 जणांचे नौदलाचे पथक बोटीसह वायू दलाच्या विमानाने कोल्हापूर विमानतळावर दाखल झाले. दाखल होताच शिरोळ येथे रेस्क्यू ऑपरेशनसाठी रवाना झाले. रात्री उशिरापर्यंत पाणी पातळी 1 फुटांनी कमी होऊन 51.2 इतकी झाली. शिवाय अनेक ठिकाणी हेलिकॉप्टरमधून फूड पॅकेट्स सुद्धा पुरविण्यात आले.

11 ऑगस्ट 2019 : पहाटे 6 वाजता राधानगरी धरणाचा 6 नंबरचा स्वयंचलित दरवाजा बंद झाला. अजूनही दोन दरवाजांमधून 4256 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता. मात्र, सकाळी अलमट्टी धरणातून तब्बल 5 लाख 30 हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू झाला. झपाट्याने पाणी पातळी कमी व्हायला सुरुवात झाली. सकाळी 10 वाजता पाणी पातळी 50.5 फुटांवर आली होती. शहरातील पाणी पुरवठा ठप्प झाल्यामुळे काहीजण पाण्याचे कॅन चढ्या दराने विक्री करू लागले. जिल्हाधिकाऱ्यांनी याची तात्काळ दखल घेत कारवाईचे आदेश दिले. शहरात सलग सहाव्या दिवशी महामार्ग बंद असल्यामुळे शहरात पेट्रोल आणि डिझेलची प्रचंड टंचाई भासू लागली. अत्यावश्यक सेवा शहरात पुरविण्याची गरज होती. त्यामुळे महामार्गावर अत्यावश्यक सेवा देणारे ट्रक लावून थांबले होते. दुपारी 12:45 वाजता महामार्गावर पाण्याचा अंदाज घेण्यासाठी जेसीबी चालवून पाहण्यात आला. मात्र अद्यापही पाण्याची पातळी जास्त होती. शिरोळमधून दीड लाखांहून अधिकांचे स्थलांतर करण्यात आले तर एकूण जिल्ह्यात 2 लाख 45 हजारांहुन अधिकांना स्थलांतरित करण्यात आले. दुपारी कोल्हापूर-गारगोटी रस्ता सुरू. गडहिंग्लज संकेश्वर मार्ग सुद्धा दुपारी 4 वाजता सुरू. दोन दिवसात शिरोळ तालुक्यात 8 टन अन्न आणि जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा. इंधनाचे काही टँकर रात्री 8 च्या दरम्यान कोल्हापूर शहरात दाखल. महामार्गावर दीड फूट पाणी असताना त्यातून काही टँकर कोल्हापुरात सोडले.



12 ऑगस्ट 2019 : सकाळी 7 वाजता पाणी पातळी 49 फुटांवर आली. तब्बल 7 दिवस बंद असलेला पुणे बेंगलोर महामार्ग सकाळी 9 च्या दरम्यान अत्यावश्यक सेवा देणाऱ्या ट्रक, टँकर, कंटेनरसाठी सुरू झाला. त्यावेळी महामार्गावर 1 फूट पाणी होते. तत्कालीन सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले कोल्हापूर दौऱ्यावर. पूरग्रस्तांना सुरळीत मदतकार्यात पार पडावे यासाठी आरडीसी संजय शिंदे यांनी बंदी आदेश लागू केला. रात्रीपर्यंत महामार्गावरील वाहतूक सुरळीत झाली. शिरोळ तालुक्यात 24 टन अन्न, धान्याचा हेलिकॉप्टरमधून पुरवठा. महापुरानंतरचा 12 ऑगस्ट 2019 हा दिवस अत्यंत महत्वाचा ठरला. अलमट्टीमधून आजपर्यंतचे सर्वाधिक 5 लाख 40 हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग. रात्री उशिरा पाणी पातळी 47 फुटांवर आली.



13 ऑगस्ट 2019 : पाणी पातळी दीड फुटांनी कमी होऊन 45.5 फुटांवर आली. सकाळी 9 वाजता ताराराणी चौक ते तावडे हॉटेलकडे जाणारा रस्ता सुरू. जिल्ह्यातील पूरग्रस्तांना 5 हजार रुपये प्रमाणे सानुग्रह अनुदान वाटप सुरू. एका दिवसात 308 कुटुंबांना 5 हजार प्रमाणे 15 लाख 40 हजार रुपयांची मदत वाटप. दिवसभरात वायुदलाच्या एमआय 17 या हेलिकॉप्टरमधून जवळपास 13 टन मदत वाटप. रात्री 11 वाजता राजाराम बंधारा पाणी पातळी 44 फुट झाली.


14 ऑगस्ट 2019 : आज सकाळी 8 वाजता पाणी पातळी 42.11 फुटांवर. कोल्हापूर-रत्नागिरी मार्ग सुरू. 249 मृत जनावरांची शास्त्रीयदृष्ट्या विल्हेवाट. पूरग्रस्त भागात आरोग्य आणि स्वच्छतेचे काम युध्द पातळीवर. अतिवृष्टीमध्ये मृत चौघाजणांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 4 लाख मदत. तर एकूण 4417 कुटुंबांना 2 कोटी 20 लाख 85 हजार सानुग्रह वाटप. रात्री 10 वाजता राजाराम बंधारा पाणी पातळी 40.6 फुटांवर.


15 ऑगस्ट 2019 : तत्कालीन सामाजिक न्यायमंत्री डॉ. सुरेश खाडे कोल्हापूर दौऱ्यावर. स्वातंत्र्य दिनानिमित्त त्यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालय येथे ध्वजारोहणाचा मुख्य सोहळा करण्यात आला. सकाळी 8 वाजता राजाराम बंधारा पाणी पातळी 39 फुटांवर. कसबा बावडा ते शिये रोड सुरू. पाणी पातळी झपाट्याने कमी होऊ लागली. 18 हजार 57 कुटुंबांना आजअखेर 9 कोटी 1 लाख 80 हजार सानुग्रह वाटप. रात्री 12 वाजता पाणी पातळी 36 फुटांवर आली आणि महाप्रलयकारी पंचगंगा नदी पात्रात जाऊन शांत झाली....

ABOUT THE AUTHOR

...view details