कोल्हापूर : Special report of Mohan Natu अहमदनगरचे यशस्वी उद्योजक मोहन नातू यांना लहानपणापासूनच पोहण्याची नितांत आवड, दररोज न चुकता दीड ते दोन तास पोहण्याचा व्यायाम, गेली 40 वर्ष नित्यनियमाने पोहण्याचा सराव केल्यामुळे पाण्यावर तरंगणे साध्य झालं. यातूनच पाण्यावरील योगासनं साकारण्याची किमया केली आहे. नुकतेच ते कोल्हापूरला येऊन गेले यावेळी पाण्यावर तरंगणारी योगासनांची प्रात्यक्षिक पाहून अनेक कोल्हापूरकर अचंबित झाले, तरुणांनी पोहण्याकडं सकारात्मकतेनं पाहून पोहण्याला दैनंदिन जीवनाचा भाग बनवावा यासाठी नातू राज्यभर प्रचार प्रसार करत आहेत.
पोहणे अनिवार्य व्हावे यासाठी यापुढेही प्रयत्न : अहमदनगर येथे फॅब्रिकेशनचे व्यावसायिक असणारे मोहन नातू दहा वर्षांपूर्वीच व्यवसायातून निवृत्त झाले. लहानपणापासून पोहण्याची आवड असल्यामुळे दिवसातील दीड ते दोन तास ते जलतरण तलावात पोहण्यातच घालवतात. यातूनच गेल्या 40 वर्षांच्या पोहण्याचा सरावात पाण्यावर तरंगायचं कसं हे त्यांनी आत्मसात केलं. यातूनच पाण्यावर तरंगणारी योगासन ते गेली दहा वर्ष करत आहेत. जास्तीत जास्त तरुणांनी पोहण्याला दैनंदिन जीवनाचा भाग बनवावा यासाठी मोहन नातू कोल्हापूर, नगर नाशिक महाबळेश्वर या ठिकाणी लोकांना एकत्र करून पाण्यावर तरंगणाऱ्या योगासनाची प्रात्यक्षिक करून दाखवतात. नुकतीच त्यांनी कोल्हापुरातील सर पिराजीराव घाटगे ट्रस्टच्या भवानी जलतरण तलावात ही प्रात्यक्षिक सादर केली यावेळी जमलेले कोल्हापूरकर अचंबित झाले. राज्यातील तरुणांच्या दैनंदिन आयुष्यात पोहणे अनिवार्य व्हावे यासाठी यापुढेही प्रयत्न करणार असल्याचे मोहन नातू यांनी सांगितलं.