कोल्हापूर-. दारूच्या नशेत मुलानेच वडिलांचा खून करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील देसाईवाडी येथे घडली आहे. ही घटना सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे. 58 वर्षीय मनोहर अप्पाजी गावडे असे खून झालेल्या वडिलांचे नाव आहे. तर सागर मनोहर गावडे असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे.
चंदगड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गावडे कुटुंबीय मूळचे जांबरे येथील असून चंदगड तालुक्यातील देसाईवाडी ते वास्तव्यास आहेत. मुलगा सागर याला दारूचे व्यसन असल्याने त्याचा वडील मनोहर गावडे यांच्याशी वारंवार वाद व्हायचा. मनोहर गावडे आणि सागर गावडे या दोघा बाप-लेकांना दारूचे व्यसन होते. आई मीनाक्षी यांनी वेळोवेळी मध्यस्थी करून पिता-पुत्रांतील वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. मात्र, सागर व्यसनाच्या अधीन गेल्याने घरामध्ये रोजच भांडणे सुरू असायची. वाद विकोपाला गेल्याने अखेर वडिलांचा खून करून या वादाचा शेवट मुलगा सागर याने केल्याची चर्चा गावात सुरू आहे.
व्यसनामुळे कुटुंबच उद्धवस्त-रविवारी चंदगड येथील गावडे यांचे पाहुणे सातवणेकर यांच्या घरी बारशाचा कार्यक्रम होता. रात्री उशिरा बारशाचा कार्यक्रम आटोपून मनोहर आणि सागर गावडे घरी परतले होते. मात्र मीनाक्षी गावडे आपल्या नातेवाईकांच्याकडेच थांबल्या होत्या. या कार्यक्रमाच्या वेळी सागर हा दारू पिऊन तिथे आला. त्याने तुझ्या नवऱ्याला संपवतो अशी आईला धमकी दिली. वडिलांशी वाद झाल्यानंतर सागरने चाकूने मनोहर गावडे यांच्या हातावर वार केला. त्यांचा गळा आवळून खून केला. सोमवारी सकाळी त्या घरी परतल्यानंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेला नवरा आणि तुळीला गळफास लावून घेतलेला मुलगा पायाखालची जमीनच सरकली. दोन मृतदेह पाहून मीनाक्षी यांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता, दारूच्या व्यसनामुळे कुटुंबच उद्धवस्त झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
मुलाविरोधात गुन्हा दाखल-पती मनोहर गावडे यांना धारधार चाकूने जखमी करून त्यांचा गळा आवळून खून केल्याप्रकरणी 35 वर्षीय मुलगा सागर गावडे यांच्याविरोधात आई मीनाक्षी गावडे यांनी चंदगड पोलिसात तक्रार दाखल केली आहे. दारूच्या नशेमध्ये स्वतःच्या मुलाने वडिलांचा खून केला आहे.
|