कोल्हापूर - कोल्हापूर शहरात कोरोना लसीचा तुटवडा असल्याने 11 पैकी नऊ लसीकरण केंद्रे बंद करून दोनच लसीकरण केंद्रांवर लस दिली जात आहे. फिरंगाई आणि सदर बाजार या ठिकाणी कोरोनाची लस उपलब्ध असल्याने शहरातील नागरिकांनी आज सकाळी या लसीकरण केंद्रांवर गर्दी केली. गर्दीमुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला. उशिरापर्यंत रांगेत उभे राहूनही लस मिळत नसल्याने फिरंगाई तालीम लसीकरण केंद्रावर नागरिकांनी गोंधळ घातला.
हेही वाचा -सर्वोच्च न्यायालयात सत्याचा विजय झाला- चंद्रकांत पाटील
सांगली, सातारा नंतर आता कोल्हापूर जिल्ह्यातही कोरोना लसीचा तुटवडा भासत आहे. जिल्ह्यात पुढचे एक दिवस पुरेल इतकाच लसीचा साठा शिल्लक आहे. केवळ १९ हजार ढोस शिल्लक आहेत. लसीची कमतरता असल्याने कोल्हापूर शहरासह ग्रामीण भागातील अनेक लसीकरण केंद्रे बंद करण्यात आली आहेत. कोल्हापूर शहरातील 11 पैकी तब्बल 9 लसीकरण केंद्रे आजपासून बंद करण्यात आली आहेत. केवळ दोनच केंद्रांवर लसीकरण सुरू आहे. त्यामध्ये फिरंगाई तालीम व सदर बाजार येथील केंद्रांचा समावेश आहे. त्यामुळे, आज सकाळपासून नागरिकांनी या केंद्रांवर गर्दी केली.