कोल्हापूर - कोबीचा दर कोसळल्यामुळे शेतकऱ्याने उभ्या पिकात शेळ्या, मेंढ्या सोडल्याचा प्रकार बेळगाव जिल्ह्यातील उचगाव येथे घडला आहे. उचगाव परिसरात भाजीपाला मोठ्या प्रमाणात पिकवला जातो. यंदा कोबी पीक मोठ्या प्रमाणात घेण्यात आले आहे. पण, कोबी कवडीमोल दराने विकला जात आहे.
सध्या मार्केटमध्ये कोबीला दहा किलोला 50 रुपये दर आहे. म्हणजे 5 रुपये किलो दराने कोबी विकला जात आहे. यामुळे शेतकऱ्याला कामगारांची मजुरी व वाहतूक खर्च निघेल इतका पैसाही मिळत नाही. पदरमोड करून त्यांना कोबी बाजारात न्यावा लागत आहे. सध्याच्या दरात उत्पादन खर्चही निघत नसल्याचे कोबी उत्पादकांचे म्हणणे आहे.
ही सर्व स्थिती पाहून एका शेतकऱ्याने शुक्रवारी थेट कोबीच्या पिकात शेळ्या, मेंढ्या सोडल्या आहेत. त्यांचेतरी पोट भरेल अशी अपेक्षा शेतकऱयाने व्यक्त केली.