वृक्षांना बसवले क्यूआर कोड कोल्हापूर :कागल तालुक्यात असलेल्या सिध्दनेर्ली गावात निसर्ग व पर्यावरण संघटनेने लोकांच्या सहभागातून गावातील वैकुंठभूमी परिसरात 2 वर्षापूर्वी वृक्षारोपण केले. यामध्ये वड, पिंपळ, लिंब,जांभूळ, कदंब, चिंच, आंबा, चाफा अशा देशी रोपांचा समावेश आहे. मयत नातेवाईकांच्या स्मृती जपण्यासाठी या परिसरात वृक्ष लावण्यात आली आहेत.
मिळणार वृक्षाची माहिती: वैकुंठभूमीत लावण्यात आलेल्या वृक्षांच्या सभोवती पार कट्टे बांधण्यात आली आहेत. या पार कट्ट्यांना क्यूआर कोड बसवले आहेत. त्या क्युआर कोडला स्कॅन केले तर एका क्लिकवर त्या वृक्षाचे नाव आणि त्याची शास्त्रीय माहिती वृक्षप्रेमींना मिळेल. वैकुंठभूमीत अंत्यविधी आणि रक्षा विसर्जनसाठी नागरिक येतात. याशिवाय बाजूला असलेल्या म्हसोबा देवालय आणि बाजार परिसरामुळे नागरिकांची या भागात वर्दळ असते. तसेच दिंडी आणि वारीला जाणारे लोक या परिसरात विसावा घेत असतात. यासर्व नागरिकांना वृक्षाच्या छायेसह त्या वृक्षाची माहिती देखील मिळणार आहे. कोट सह्याद्री देवराईच्या माध्यमातून सातारा येथे राबवलेल्या उपक्रमाचे अनुकरण कोल्हापुरातील सिद्धीनेर्लीने केले आहे. दरम्यान या क्युआर कोडमुळे या परिसरात लावलेल्या वृक्षांची माहिती नागरिकांना मिळेल. शासकीय मदतीशिवाय लोक सहभागातून पर्यावरणपूरक उपक्रम यशस्वीपणे राबवता येतात. हे सिद्धनेर्लीकरांनी दाखवून दिले.
वृक्ष चळवळ: कागल तालुक्यातील पिराचीवाडी ग्रामपंचायतीनेही असा उपक्रम राबवला आहे. मात्र पिराचीवाडीच्या उपक्रमाला शासनाने मदत केली आहे. दरम्यान सिद्धनेर्ली येथील वृक्ष चळवळ 2018 पासून लोक सहभागातून सुरू आहे. खासकरुन कोरोना काळात गावकऱ्यांनी या उपक्रमाला पाठबळ दिले. देशाच्या अमृत महोत्सवानिमित्त सिध्दनेर्लीकरांनी एक सलामी देशासाठी एक सलामी वृक्षांसाठी,असा उपक्रम अभिनेते सयाजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली राबवला होता. सयाजी शिंदे हे सह्याद्री देवराई संस्थेचे अध्यक्ष आहेत.
अनेकांची मिळाली मदत: दरम्यान गावाने राबवलेल्या या उपक्रमात 750 गावकऱ्यांनी वृक्षारोपण केले आहे. या वृक्षांच्या संगोपनाची जबाबदारी निसर्ग व पर्यावरण संघटनेने घेतली आहे. सरपंच दत्तात्रय पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी 51 हजार वृक्षांची देणगी दिली होती. तसेच उपक्रमाला परदेशातून आणि जिल्ह्याच्या बाहेर असलेल्या गावकऱ्यांनी मदतीचा हात दिला आहे. यामुळे हा उपक्रम यशस्वीपणे राबवला गेला आहे. परदेशातील आणि जिल्ह्याच्या बाहेर नोकरीसाठी असलेल्या लोकांनी या उपक्रमाला मदत केली आहे. यात गोरखनाथ पाटील (अमेरिका), संभाजी खोत (फिनलँड) यांच्यासह बारामती येथे सार्वजनिक बांधकाम विभागातील कनिष्ठ अभियंता विशाल पाटील, रत्नागिरी जिल्ह्यात शिक्षक म्हणून काम करणारे सुरेश आगळे, वित्त व लेखा अधिकारी उमेश मगदूम, मुंबई पोलीस दलात कार्यरत असणारे गणेश पाटील तर सैन्य दलात आपली सेवा बजावणारे राजेंद्र मगदूम, मनोहर लाड यांनी या उपक्रमाला साथ दिली आहे.
हेही वाचा-
- Kolhapur Rain : कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी; पहिल्याच पावसात प्रसिद्ध राऊतवाडी धबधबा प्रवाहित
- Panchganga Water level: कोल्हापुरात पावसाचा जोर; ७ बंधारे पाण्याखाली, राधानगरीतून 700 क्यूसेक पाण्याचा विसर्ग