कोल्हापूर -येथून ‘भारत माता की जय !’ अशा घोषणा देत बिहारमधील 1 हजार 320 मजूर 'श्रमिक' या विशेष रेल्वेने बुधवारी बिहारकडे रवाना झाले. सायंकाळी 7 वाजून 20 मिनिटांनी ही विशेष रेल्वे बिहारकडे रवाना झाली. प्रशासनाने त्यांची केलेली सुविधा आणि गावी जाण्याचा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसून येत होता. प्रवाशांनीही टाळ्या वाजवून आणि घोषणा देवून हा आनंद व्यक्त केला.
बिहार शासनाकडून मंजुरी आल्यानंतर प्रशासनाने जिल्ह्यातील विविध तालुक्यातील मजुरांना राज्य परिवहन महामंडळाच्या 49 बसमधून छत्रपती शाहू महाराज टर्मिनस येथे आणले. याठिकाणी प्रवासाची रेल्वे तिकीटे त्यांना देण्यात आली. थर्मल स्कॅनिंग, सॅनिटायझर आणि सामाजिक अंतर याचा वापर करत त्यांना रेल्वेच्या बोगीमध्ये प्रवेश देण्यात आला.