कोल्हापूर - आजरा तालुक्यातील 'आजरा सहकारी साखर कारखाना' सुरू व्हावा, या मागणीसाठी शिवसेनेने रास्ता रोको आंदोलन केले. संकेश्वर- सावंतवाडी राज्य मार्ग रोखत हे आंदोलन करण्यात आले. कोणत्याही परिस्थितीत लवकरात लवकर हा कारखाना सुरू करा, अशी मागणी आंदोलकांनी केली.
आजरा साखर कारखाना सुरू करण्यासाठी शिवसेनेचा रास्तारोको कोल्हापूरचे शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे यांच्या नेतृत्वाखाली हे रास्ता रोको आंदोलन झाले. यामुळे एक तास वाहतूक ठप्प झाली होती. या परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
शेतकऱ्यांनी कष्टाचा पैसा गोळा करत आजारा सहकारी साखर कारखाना उभा केला. मात्र, कोल्हापूर जिल्हा बँकेने थकीत कर्जापोटी कारखाना ताब्यात घेतला. त्यानंतर बँकेने कारखाना चालवायला देण्यासाठी निविदा प्रसिद्ध केली. एका कंपनीने निविदा भरली होती. मात्र, संबंधित कंपनी आर्थिकदृष्ट्या सक्षम नसल्याने बँकेने ती निविदा रद्द केली. त्यानंतर कारखान्याच्या अध्यक्ष आणि संचालकांनी शासनाकडे थकहमीची मागणी केली. मात्र, ही थकहमी देण्यासाठी बँकेच्या ना हरकत पत्राची गरज आहे. अद्याप बँकेने हे पत्र दिलेले नाही.
विजयादशमीपासून गळीत हंगाम सुरू होणार आहे. त्याअगोदर जर जिल्हा बँकेने शासनाला ना हरकत पत्र दिले तर कारखाना सुरू होऊ शकतो. त्यामुळे याबाबत बँकेने आणि शासनाने लवकरात कार्यवाही करावी व शेतकाऱ्यांच्या हक्काचा कारखाना पुन्हा सुरू करावा, अशी मागणी शिवसेना जिल्हा प्रमुख विजय देवणे यांनी केली.