कोल्हापूर -दोन दिवसांपूर्वी कोल्हापुरातील ऐतिहासिक पन्हाळगडावर एका झुणका भाकरी स्टॉलवर 15 ते 20 जणांच्या ग्रुपने खुलेआम दारू पार्टी केली. याबाबतच एक व्हिडिओ सुद्धा समोर आला असून यामध्ये अनेक महिला तसेच पुरुष दारू ढोसत असताना दिसत आहेत. याची माध्यमांनी बातमी लावताच पोलिसांनी तत्काळ झुणका भाकरी ( Jhunka Bhakar Center Panhal Fort ) स्टॉल चालकावर गुन्हा दाखल केला. मात्र तिथे जे पर्यटक खुलेआम दारू पार्टी करत होते, यांच्यावर कोणत्याही पद्धतीने गुन्हा दाखल केला नाही. त्यामुळे शिवप्रेमी चांगलेच संतापले आहेत. महाराष्ट्रातील नागरिकांच्या भावना दाखवून खुलेआम गडावर दारू पिणाऱ्यांवर कोणत्याही परिस्थिती गुन्हा दाखल करावा आणि त्यांना कडक शिक्षा करावी, अशी मागणी आता केली जात आहे. शिवप्रेमी हर्षल सुर्वे यांनी याबाबतची मागणी केली आहे.
...मग शिवप्रेमींच्या भावना दुखावून खुलेआम दारू पिणाऱ्यांवर का नाही? :काल सोमवारी पन्हाळा पोलिसांनी ज्या ठिकाणी संबंधित पर्यटक दारू पार्टी करत होते त्या झुणका भाकरी स्टॉलवर गुन्हा दाखल केला आहे. स्टॉलचे चालक दिलीप अतिग्रे यांच्याकडे तपासणी केली असता त्यांच्याकडे दारूच्या बाटल्या आढळल्या. त्यामुळे त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्र दारू बंदी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला. मात्र जे पर्यटक दारू पिताना पाहायला मिळाले त्यांच्यांवर सुद्धा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी सुरू आहे. शिवाय ते पर्यटक परराज्यातील असल्याचे समजले मात्र त्यांना कुठूनही शोधून काढा आणि कडक शासन करा जेणेकरून इथून पुढे जर कोणी गडावर दारू पिण्याचे धाडस करत असेल तर त्यांना काय शिक्षा असते याचा संदेश जाईल, असेही हर्षल सुर्वे यांनी म्हटले आहे.