कोल्हापूर - महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरी शिनोळी गावात कर्नाटक पोलीस आणि शिवसैनिकांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. बेळगावात मराठी भाषिकांनी आयोजित केलेला मोर्चा रद्द झाला. मात्र, कोल्हापुरातील शिवसैनिक बेळगावमध्ये जाऊन त्या ठिकाणी भगवा ध्वज फडकवणार आहेत. काही दिवसांपूर्वी कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या संघटनेचा ध्वज बेळगाव महानगरपालिकेसमोर लावला होता. याला विरोध करत मराठी भाषिकांनी आंदोलन छेडले होते. हा ध्वज त्वरित काढून घ्यावा, यासाठी काल (बुधवारी) बेळगावमध्ये मोठा मोर्चा निघणार होता. मात्र, या मोर्चाला परवानगी न मिळाल्याने तो स्थगित झाला. त्यामुळे आता कोल्हापुरातील शिवसैनिक बेळगावकडे रवाना झाले होते.
कर्नाटक पोलीस आणि शिवसैनिकांमध्ये जोरदार बाचाबाची झाली कर्नाटक पोलिसांचा तगडा बंदोबस्त -
शिवसेनेचे कार्यकर्ते कर्नाटककडे रवाना झाले आहेत. या पार्श्वभूमीवर कर्नाटक पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर असणाऱ्या कोगणोली टोलनाका कडक सुरक्षेत आहे. तर, चंदगड तालुक्यातील शीणोळी, संकेश्वर-गडहिंग्लज मार्गावरदेखील मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कर्नाटकात येणाऱ्या प्रत्येक गाडीची झाडाझडती घेऊनच पोलीस कर्नाटकात प्रवेश देत आहेत. आता या प्रकरणावरून पुन्हा एकदा महाराष्ट्र-कर्नाटकमध्ये सीमावाद उफळण्याची शक्यता आहे.
कन्नड संघटनेच्या विरोधात शिवसेनेचे आंदोलन -
पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारल्याने बेळगावमधील मराठी भाषिकांचा मोर्चा स्थगित करण्यात आला आहे. मात्र, कोल्हापूरातील शिवसैनिक आंदोलन करण्यावर ठाम आहे. चंदगड तालुक्यातील शिनोळी गावापासून शिवसेना बेळगावमध्ये प्रवेश करणार आहे. मात्र, कर्नाटक पोलीस शिवसेनेला येऊ देणार का? हा सवाल आहे. कन्नड संघटनेने बेळगाव महानगरपालिकेसमोर बेकायदेशीररित्या ध्वज उभारला आहे. त्या विरोधात हे आंदोलन आहे. लाल-पिवळा ध्वज हठवण्याची मराठी भाषिकांची मागणी आहे.
कर्नाटक पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला आहे कर्नाटकातील मराठी गावे महाराष्ट्रात आणणार -
बेळगाव, कारवार, बिदर, भालकीसह कर्नाटक सीमाभागातील सर्व मराठी भाषिक गावे महाराष्ट्रात सामील करुन संयुक्त महाराष्ट्राची स्थापना करणे, कर्नाटकव्याप्त शेवटचे मराठी गाव महाराष्ट्रात येईपर्यंत सर्वशक्तीनिशी लढत राहणार असल्याचा निर्धान राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी व्यक्त केला आहे.
काय आहे सीमावाद -
१७ जानेवारी १९५६ मध्ये बेळगाव, कारवार, बिदरसारखी मराठी गावे तत्कालिन म्हैसूर राज्याला अन्यायकारक पद्धतीने जोडण्यात आली. सीमाभागातील मराठी बांधवांवर व महाराष्ट्र राज्यावर त्यावेळी झालेला अन्याय दूर करण्यासाठी मराठी बांधवांचा लढा अखंड सुरू आहे. संयुक्त महाराष्ट्रासाठी लढणाऱ्या आंदोलकांवर, 18 जानेवारी 1956 रोजी मुंबईत गोळ्या चालवण्यात आल्या होत्या. त्यात महाराष्ट्राचे १० सुपुत्र शहीद, तर अडीचशेहून अधिक जण जखमी झाले होते.