कोल्हापूर - शिरोळ तालुक्यातील महापूर ओसरल्यानंतर अनेक गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. परिस्थिती पूर्वपदावर येत असली तरी जनावारांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. जिल्ह्यात हजारो हेक्टरवरील पीक, चारा कुजल्याने जनावरांना चारा मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे एकवेळ आमची जनावरे पुरात वाहून गेली असती तर चालले असते, पण त्यांची उपासमार पाहू शकत नाही. आमच्यावर राहूदे पण आमच्या जनावारांवर तर दया दाखवा, अशी आर्त हाक राज्य सरकारला शेतकऱ्यांनी दिली आहे.
उपासमारीची वेळ
कोल्हापूर जिल्ह्यात महापुरामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील पंचगंगा, वेदगंगा, दूधगंगा, कुंभी, कासारी, तुळशी, भोगावती नदी शेजारील पिके पाण्याखाली गेल्याने कुजली आहेत. तर यंदाच्या महापुराची भीषणता सर्वात जास्त शिरोळ तालुक्याला जाणवत आहे. कारण कृष्णा नदीच्या काठावर शिरोळ तालुका असल्याने जवळपास 42 गावे पूर्णतः पाण्याखाली गेली होती. तर परिसरातील हजारो हेक्टर शेती, पिके, चारा पाण्याखाली गेला. त्यामुळे जनावरांना मिळणारा चारा न मिळाल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. तसेच जनावारांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.
गायी, म्हैस आठण्याचा प्रकार
शिरोळ तालुक्यातील जनावरांना वेळेत चार, खाद्य मिळत नसल्याने त्याचा परिणाम देणाऱ्या दुधावर होत आहे. त्यामुळे गायी व म्हैस यांच्यावर त्याचा थेट परिणाम झाल्याने दरवेळी १० ते १२ लिटर येणारे दूध सध्या ७ ते ६ लिटरवर येत आहेत. सानुग्रह अनुदान मिळाले नसल्याने त्यांचे खाद्यदेखील खरेदी करण्यासाठी पैसे नाहीत, अशी अवस्था शिरोळ तालुक्यातील शेतकऱ्याची बनली आहे.