कोल्हापूर - काँग्रेस शिवाय भाजपा विरोधात देशात सक्षम आघाडी करणं शक्य नाही. काँग्रेस हा देशातील प्रत्येक राज्यात पसरलेला पक्ष आहे. मान्य आहे अनेक ठिकाणी त्यांची सत्ता नाही. मात्र त्यांना सोबत घेऊनच एक सक्षम पर्याय बनवला गेला पाहिजे. शिवाय मी सुद्धा यूपीएचे नेतृत्व करावे असे बोलले जाते. पण मला त्यामध्ये अजिबात रस नाही. मात्र, भाजपा विरोधातील निर्माण होणाऱ्या आघाडीला माझा पूर्ण पाठींबा असेल. त्यांना लागणारी सर्व मदत करायला पण तयार आहे, असे राष्ट्रवादीचे नेते शरद पवार म्हणाले. कोल्हापूरात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
...त्यांच्या तोंडावर आपण बंधन आणू शकत नाही - राज ठाकरे आणि गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवरती मुंबई येथे मेळावा घेतला. त्यामध्ये त्यांनी भाजपाचे कौतुक करत शिवसेना तसेच राष्ट्रवादीवर जोरदार टीका केली. त्यावर बोलताना शरद पवार म्हणाले, राज ठाकरे काहीही बोलू शकतात. त्यांच्या तोंडावर आपण बंधन आणू शकत नाही. उत्तर प्रदेशात त्यांना काय दिसलं हे माहिती नाही. दरम्यान, राज ठाकरे यांचा पक्ष किती प्रभावी आहे हे सांगू शकत नाही पण आजपर्यंत च्या निवडणुका पाहून मात्र हे स्पष्ट होईल असेही त्यांनी यावेळी म्हटले.