कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर राज्यात शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली दोन सभा झाल्या आहेत. आता राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापुरात शरद पवार यांची निर्धार सभा होत आहे. या सभेआधी कोल्हापुरातील दसरा चौकात 'बाप तो बापच . .' असा आशय लिहिलेलं बॅनर झळकलं आहे. यामुळे आजच्या सभेत शरद पवार नेमका कोणावर निशाणा साधतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
शरद पवारांचे कोल्हापूरशी आहेत ऋणानुबंध :शरद पवार यांचे कोल्हापूरशी ऋणानुबंध आहेत. शरद पवार यांचं आजोळही कोल्हापूर जिल्ह्यातील असल्यानं येथील कार्यकर्त्याला अगदी नावानिशी शरद पवार ओळखतात. राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना 10 जून 1999 रोजी कोल्हापुरात झाली. तेव्हापासून राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार आणि कोल्हापूर हे समीकरण अधिक घट्ट झालं आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला कोल्हापूर जिल्ह्यानं स्थापनेनंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत दोन खासदार दिले. दिवंगत खासदार सदाशिवराव मंडलिक, दिग्विजय खानविलकर, माजी खासदार निवेदिता माने, लेमनराव निकम, व्ही. बी. पाटील, आर. के. पवार अशी तगडी फौज राष्ट्रवादीकडं होती. राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी अजित पवार यांच्या गटासोबत जात शरद पवारांच्या राष्ट्रवादीपासून फारकत घेतली आहे. याचे पडसाद जिल्ह्यात नक्की उमटणार आहेत.