कोल्हापूर :नवीन कोण राज्यपाल येणार हे माहीत नाही. मात्र आताच्या राज्यपालांकडून महाराष्ट्राची सुटका होतेय ती चांगली गोष्ट आहे. असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यपालांना टोला लगावला आहे. तसेच पहाटेच्या शपथविधीला दोन वर्ष होऊन गेली. आता तो प्रश्न कशाला काढायचा असे म्हणत पहाटेच्या शपथविधी संदर्भात बोलण्याचे त्यांनी टाळले आहे. ते आज कोल्हापुरात पत्रकार परिषदेत बोलत होते. तर आगामी काळात निवडणुकीला आम्ही महाविकास आघाडी म्हणून सामोरे जाणार आहोत. मात्र शिवसेना ठाकरे गट आणि वंचितची युती झाली आहे. आम्ही उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत एकत्र आहोत पण वंचित संदर्भात अद्याप कोणतेही चर्चा झाली नाही असेही ते यावेळी म्हणाले आहेत.
विरोधकांची एकी करण्याचा प्रयत्न : देशात झालेल्या एका सर्वेनुसार भाजप विरोधात सध्याचे जनमत दिसून येत आहे. सत्ताधारी मंडळींच्या विरोधात जनमत आहे. कर्नाटकात देखील भाजपचे सरकार येणार नाही असे सध्या दिसत आहे. असे असले तरी विरोधकांची एकी करण्याचा प्रयत्न आमचा सुरू आहे. पण अद्याप अजून कोणताही पक्का निर्णय झालेला नाही. प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या समस्या आहेत त्या सोडवाव्या लागतील. सर्व विरोधकांच्या चर्चा दिल्लीतून सुरू आहेत. असे शरद पवार म्हणाले आहेत. सत्ताधाऱ्यांना विरोध केला की, त्यांच्या नेत्यांच्या मागे तपास यंत्रणा लावली जाते. केंद्रीय तपास यंत्रणांचा केंद्र सरकार दुरुपयोग करत आहे. असाही आरोप पवारांनी केला.