महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ईटीव्ही भारत विशेष : कोल्हापुरात गांधीजींच्या 150 व्या जयंतीनिमित्त 76 देशातील टपाल तिकिटांचा संग्रह - गांधीजींच्या 150 व्या जयंतीनिमित्त टपाल तिकिटांचा संग्रह

आज महात्मा गांधीजींची 150 वी जयंती साजरी केली जात आहे. यानिमित्ताने भारतासह जगभरातील 76 देशांनी गांधीजींना अभिवादन करण्यासाठी 200 हून अधिक टपाल तिकीट प्रकाशित केली आहेत आणि विशेष म्हणजे त्या सर्व तिकिटांचा कोल्हापूरच्या शिवाजी पेठेत राहणाऱ्या विजयकुमार जोशी यांनी संग्रह केला आहे.

कोल्हापूर
कोल्हापूर

By

Published : Oct 2, 2020, 7:45 PM IST

Updated : Oct 2, 2020, 8:16 PM IST

कोल्हापूर - आज महात्मा गांधी यांचे 150 वे जयंती वर्ष सर्वत्र साजरे होत आहे. भारतातच नाही तर विदेशात सुद्धा उत्साहात 150 वी जयंती साजरी केली जात आहे. यानिमित्ताने भारतासह जगभरातील 76 देशांनी गांधीजींना अभिवादन करण्यासाठी 200 हून अधिक टपाल तिकीट प्रकाशित केली आहेत आणि त्या सर्व तिकिटांचा कोल्हापूरच्या शिवाजी पेठेत राहणाऱ्या विजयकुमार जोशी यांनी संग्रह केला आहे.

गांधीजींच्या 150 व्या जयंतीनिमित्त 76 देशातील टपाल तिकिटांचा संग्रह

विजयकुमार गेल्या 35 वर्षांहून अधिक काळ एका बँकेत नोकरी करून 2015 साली निवृत्त झाले. त्यांना गेल्या 50 वर्षांपासून टपाल तिकिटांचा संग्रह करण्याबरोबरच अनेक आगळ्या-वेगळ्या वस्तूंचा संग्रह करण्याचा छंद आहे. त्यांनी या छंदासाठी आत्तापर्यंत जवळपास 18 ते 20 लाख रुपये खर्च केले आहेत. यंदा गांधीजींची 150 वी जयंती वर्ष आहे. त्यानिमित्ताने गांधीजींना अभिवादन करण्यासाठी जगभरात अनेक देशांनी प्रकाशित केलेल्या सर्व टपाल तिकिटांचा संग्रह त्यांनी केला आहे. यासाठी अडीच ते तीन लाख रुपये खर्च केल्याचे त्यांनी सांगितले. एकूण 76 देशांनी यावर्षी गांधीजींना अभिवादन करण्यासाठी टपाल तिकीट प्रकाशित केली आहेत. त्यातील 74 देशांतील तिकीट जोशी यांनी संग्रहित केली आहेत. उरलेल्या दोन देशांमधील तिकिटेसुद्धा दोन दिवसात मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या या आगळ्या वेगळ्या संग्रहाला त्यांनी 'वर्ल्डस महात्मा' असे नाव दिले आहे.

हेही वाचा -महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त 'वैष्णव जन तो तेने रे कहिये, जे पीड पराये जाने रे...' ईटीव्ही भारतची विशेष निर्मिती

76 देशांनी प्रकाशित केलेल्या एकूण 200 तिकिटांमध्ये दक्षिण आफ्रिका, कोरिया, रिपब्लिक डी-गयाणी या देशांनी प्रकाशित केलेल्या तिकिटांमध्ये थोडे वेगळेपण आहे. रिपब्लिक डी-गयाणी या देशाने प्रकाशित केलेल्या तिकिटामध्ये तर गांधीजींना टिळा लावल्याचे दिसून येते. त्यांना एका गुरूप्रमाणे या तिकिटाच्या माध्यमातून त्यांनी दर्शवले आहे. शिवाय दक्षिण आफ्रिका खंडातील 7 देशांनी प्रकाशित केलेल्या तिकिटांमध्ये गांधीजींच्या जीवन प्रवासाचे वर्णन पाहायला मिळते.

जोशी यांनी आजपर्यंत संग्रहित केलेल्या इतर टपाल तिकिटांमध्ये संगीत, खेळ, भारतीय सण, पशु-पक्षी, विविध राज्यांची संस्कृती, अनेक राष्ट्रीय पुरुष, लेखक, यांच्यासह सर्वच खेळातील विश्वचषकांच्या तिकिटांबरोबर अनेक प्रकारच्या तिकिटांचा त्यांनी संग्रह केला आहे. पोस्टातून आलेल्या पाकिटावरील तिकीट काढून त्यांनी आपल्या संग्रहाची सुरुवात केली.

हेही वाचा -'तुम्हीच जर हतबल होऊन आत्मबलिदान केलं तर मला चांगलं वाटेल का?' संभाजीराजेंचे भावनिक ट्विट

तिकिटांच्या संग्रहासाठी विजयकुमार यांना आत्तापर्यंत 16 ते 17 लाख रुपये खर्च आला आहे. प्रत्येकवेळी संबंधित देश किंवा भारतात ठराविक प्रमाणात म्हणजेच 50 ते 100 तिकिटे प्रकाशित केली जातात. त्या 100 लोकांमध्ये माझी गणना असते ही खूप मोठी गोष्ट असल्याचेही ते अभिमानाने सांगतात. विजयकुमार यांच्या संग्रहाची सर्वत्र चर्चा असून यापुढेही अशाच पद्धतीने संग्रह करून भविष्यात त्याचे मोठे प्रदर्शन भरविण्याचा त्यांचा मानस आहे.

Last Updated : Oct 2, 2020, 8:16 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details