कोल्हापूर: देशाच्या नवीन संसदेमध्ये भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात नंदीचे चित्र असलेला राजदंड स्थापित केला जाणार आहे. 75 वर्षानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडेही रविवारी होणाऱ्या संस्थेच्या उद्घाटन प्रसंगी असाच राजदंड सोपवण्यात येणार आहे. खास वैशिष्ट्य म्हणजे, या राजदंडाशी साधर्म साधणारा राजदंड कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यामध्ये असणाऱ्या चक्रेश्वरवाडीतल्या सुरसुंदरीच्या भग्न मूर्तीच्या हातात छातीजवळ धरलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. मंदिरात आढळलेली ही मूर्ती बाराव्या शतकातील असल्याचे शिलालेख पुरावे आहेत.
2003 मध्ये मिळाले होते पुरावे:करवीर महात्म्याचा अभ्यास करताना 2003मध्ये अभ्यासकांना राधानगरी तालुक्यातील चक्रेश्वरवाडीतल्या मंदिरात सुरसुंदरीची भग्न अवस्थेत असलेली मूर्ती मिळाली होती. ही मूर्ती सुमारे दीड ते दोन फुटांची असून हातामध्ये छातीजवळ राजदंड धरलेल्या अवस्थेत आहे. चक्रेश्वरवाडीतील प्राचीन शिवमंदिर बाराव्या शतकातील असून ही मूर्ती सध्या भग्न अवस्थेत आढळून आली आहे. राजदंडाला धारण करणारी स्त्री असल्याने सार्वभौम सत्तेचे पुरावे करवीर नगरीत पाहायला मिळतात.
ती याचिका न्यायालयाने फेटाळली: नवीन संसद भवनाच्या उद्घाटनावरुन सध्या देशभरात रणकंदन सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदिवासी महिला असल्याने राष्ट्रपती दौर्पदी मुर्मू यांना नवीन संसद भवनाचे उद्घाटन करण्यापासून डावलण्यात आल्याचा विरोधकांचा आरोप आहे. त्यामुळे द्रौपदी मुर्मू यांनाच नवीन संसद भवनाचे उद्घाटन करण्याबाबत विरोधी पक्ष आग्रही आहेत. त्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आली होती. मात्र न्यायालयाने ही याचिका फेटाळून याचिकाकर्त्याला दणका दिला आहे.
काय आहे याचिकेचे प्रकरण: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकालात नवीन संसदेचे बांधकाम करण्यात आले आहे. या नवीन संसद भवनाच्या इमारतीचे उद्घाटन 28 मे रोजी करण्यात येणार आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या इमारतीच्या उद्घाटनाला विरोध करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या इमारतीचे उद्घाटन करु नये, यासाठी विरोधकांनी मोट बांधली आहे.