महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'त्या' देवदूतामुळं गेल्या 26 वर्षात वाचले 110 जणांचे प्राण; वाचा जीवरक्षक उदय निंबाळकर यांचा प्रेरणादायी प्रवास - Jivrakshak Uday Nimbalkar

Uday Nimbalkar story : आजवर सव्वाशे लोकांना जीवदान देणारे आणि बुडालेले शंभरपेक्षा जास्त मृतदेह बाहेर काढलेले कोल्हापूरचे 'जीवरक्षक उदय निंबाळकर' (Jivrakshak Uday Nimbalkar) यांचा प्रेरणादायी प्रवास. 1997 पासून पाण्यात बुडणाऱ्यांच्या शरीरात प्राण फुंकण्याचं काम निंबाळकर यांनी केलं आहे.

Uday Nimbalkar News
उदय निंबाळकर

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 28, 2023, 10:18 PM IST

प्रतिक्रिया देताना जीवरक्षक उदय निंबाळकर

कोल्हापूर Uday Nimbalkar story : आजच्या मोबाईलच्या दुनियेत समाजातील संवेदनशीलता कुठेतरी हरवत चालली आहे. एकीकडे अशी ओरड होत असताना दुसरीकडे मात्र कोणत्याही स्वार्थाशिवाय स्वतःचा जीव धोक्यात घालून इतरांचे जीव वाचवण्यासाठी धडपडत असलेले अनेकजण आपण पाहतो, कोल्हापूर जिल्ह्यासह परिसरात नदी, विहीर तलावातील कोणतीही दुर्घटना घडू दे अशावेळी एकच नाव आठवतं ते म्हणजे 'जीवरक्षक उदय निंबाळकर'. (Jivrakshak Uday Nimbalkar) कोणत्याही मोबदल्याशिवाय निस्वार्थीपणे समाजाची सेवा करण्याचे व्रत घेतलेल्या कोल्हापूरच्या उदय निंबाळकर यांच्या 26 वर्षांच्या प्रवासाचा घेतलेला आढावा.


'पट्टीचा पोहणारा' अशी ओळख :कोल्हापूरची जीवनदायिनी पंचगंगा नदीपासून (Panchaganga River) हाकेच्या अंतरावर असलेल्या पंचगंगा तालीम परिसरात उदय निंबाळकर लहानाचे मोठे झाले. अगदी चार पावलांवर नदी असल्याने लहानपणापासूनच निंबाळकर यांना पोहण्याची दांडगी हौस, फावल्या वेळात नदीमध्ये जाऊन मनसोक्त पोहण्याचा आनंद घेणं हा त्यांचा बालपणापासूनचा छंद होता. पुढे ऐन तारुण्यात घरची जबाबदारी अंगावर पडली आणि या छंदापासून ते काहीसे बाजूला गेले. मात्र नदी, विहीर किंवा तलावाशेजारी एखादी दुर्घटना घडली की, त्या ठिकाणी जाऊन ते मदत करायचे, यातूनच 'पट्टीचा पोहणारा' अशी ओळख त्यांची दृढ झाली.

दोन मुलींना जीवदान दिलं: 26 जानेवारी 1997 रोजी कोल्हापूरचे वैभव असलेल्या 'रंकाळा तलाव' (Rankala Lake) परिसरात निंबाळकर कुटुंबीयांसोबत फिरायला गेले होते, या ठिकाणी नौकानयन करत असताना क्षमतेपेक्षा जास्त लोक असलेली होडी रंकाळ्यात उलटली, होडीतील माणसं बुडताना पाहून संवेदनशील मनाचे निंबाळकर त्यांनी तात्काळ रंकाळ्यात उडी घेत दोन मुलींना जीवदान दिलं, स्थानिकांनी होडीतून उलटलेल्या अन्य लोकांनाही बाहेर काढलं, तेव्हापासून सुरू झाला निंबाळकर यांचा धाडसी प्रवास. जिल्ह्यात आणि जिल्हया बाहेर विहीर, तलाव, नदी परिसरात कोणतीही दुर्घटना घडली की, त्या ठिकाणी जीवरक्षक उदय निंबाळकर देवदुतासारखे हजर होतात.

संकटात असलेल्या व्यक्तीच्या मदतीसाठी धावून जातात: पाण्याचा अचूक अंदाज घेत, दीर्घ श्वास घेऊन एकाच उडीत मृतदेह किंवा वस्तू अलगत पाण्यातून बाहेर काढण्यात पटाईत असलेले उदय निंबाळकर यांचे किस्से कोल्हापुरातील चौका-चौकात ऐकायला मिळतात. दररोज पहाटे पंचगंगा नदी घाट ते शिवाजी पूल हे अंतर पंचगंगा नदीमध्ये पोहत जाऊन रोजचा सराव ते करतात. निंबाळकर यांना कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रातून एखादा फोन आल्यास, तात्काळ जिथे असतील तिथं आपली रिक्षा लावून निंबाळकर संकटात असलेल्या व्यक्तीच्या मदतीसाठी धावून जातात. गेली 26 वर्ष निस्वार्थी निंबाळकर यांचे समाजाप्रती असलेले काम अविरत सुरू आहे. अनेक कौटुंबिक अडचणींवर मात करत जीवरक्षक उदय निंबाळकर कोणत्याही आपत्तीत हिरीरीने सहभागी होतात. आपण समाजाचे काहीतरी देणं लागतो हा उदांत हेतू डोळ्यासमोर ठेवून त्यांची वाटचाल सुरू आहे.


भाड्याच्या घरात राहण्याची वेळ: 2021 मध्ये कोल्हापुरात आलेल्या महापुरात पंचगंगा तालमी शेजारी असलेल्या वडिलोपार्जित घर पडलं, यानंतर निंबाळकर कुटुंबीय गेल्या दोन वर्षांपासून भाड्याच्या घरात राहत आहे. आपल्या कामाची दखल घेऊन जिल्ह्यातील अनेक राजकीय पुढार्‍यांनी तुमचं काम करतो म्हणून दिलेला शब्द कधीच पाळला नाही. संकटकाळात देवदूत असलेला उदय निंबाळकर नावाचा माणूस चारचौघात दिसला की, हे नेते ओळख ही दाखवत नाहीत, असे अनेक किस्से निंबाळकर यांनी सांगितले. मात्र आता उतार वयात शासनाने मानधन सुरू करावं अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.‌

हेही वाचा -

  1. Durga Deore Success Story: आंतरराष्ट्रीय धावपटू ते उपजिल्हाधिकारी! नाशिकच्या दुर्गा देवरेचा प्रेरणादायी प्रवास, वाचा सविस्तर
  2. Cycle Journey : एका पायावर सायकलने गाठले दोन लाख किलोमीटर अंतर; डॉ. राजू तुरकाने यांचा प्रेरणादायी प्रवास
  3. पश्चिम चंपारणमधील लालबाबूंचा बॅट कारागीर ते उद्योजक असा प्रेरणादायी प्रवास!

ABOUT THE AUTHOR

...view details