कोल्हापूर - मी एकीकडे.. माझी पोरं एकीकडे.. माझा नवरा एकीकडे आणि आमची जनावरे एकीकडे... या महापुरामुळे चारी दिशांना माझं कुटुंब फेकले गेले आहे. साहेब! आमच्यावर दया करा. पण पावसाळा येताच आमची दोन महिन्याची राहण्याची व्यवस्था करा. बाकी आम्हाला काही नको, अशी भावना व्यक्त करत पालकमंत्री सतेज पाटील यांच्यासमोर महिलांनी आपले अश्रू ढाळत दुःख व्यक्त केले. हे पाहून पालकमंत्री सतेज पाटील यांना देखील गहिवरून आले. सर्वजण मिळून भीषण पूर परिस्थितीवर मात करू या, तुम्ही धीर सोडू नका. अशा शब्दात पालकमंत्री सतेज पाटील यांनी शिरोळच्या पूरग्रस्तांना आधार दिला. शिरोळची पूरस्थिती गंभीर बनली आहे. या पार्श्वभूमीवर आज(रविवारी) पालकमंत्री सतेज पाटील यांनी गुरुदत्त शुगर कारखान्याच्या छावणीमध्ये असलेल्या स्थलांतरित कुटुंबांना भेट दिली.
Kolhapur Rain: पालकमंत्री सतेज पाटलांनी घेतली पूरग्रस्तांची भेट
सर्वजण मिळून भीषण पूर परिस्थितीवर मात करू या, तुम्ही धीर सोडू नका. अशा शब्दात पालकमंत्री सतेज पाटील यांनी शिरोळच्या पूरग्रस्तांना आधार दिला. शिरोळची पूरस्थिती गंभीर बनली आहे. या पार्श्वभूमीवर आज(रविवारी) पालकमंत्री सतेज पाटील यांनी गुरुदत्त शुगर कारखान्याच्या छावणीमध्ये असलेल्या स्थलांतरित कुटुंबांना भेट दिली.
कोल्हापूर जिल्ह्यात आलेल्या महापुराचा फटका शिरोळ तालुक्यातील अनेक गावांना बसला आहे. सध्या कोल्हापूर शहरातील प्रयाग चिखली, आंबेवाडी या गावातील पाण्याची पातळी कमी होत असली तरी शिरोळ तालुक्यातील अनेक गावात पूरस्थिती आजही गंभीर आहे. त्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री सतेज पाटील यांनी शिरोळ तालुक्याला भेट दिली. दरम्यान लष्करी जवान आणि एनडीआरएफ टीमच्या माध्यमातून स्थलांतरित करण्यात आलेल्या कुटुंबांची पालकमंत्री सतेज पाटील यांनी गुरुदत्त शुगर कारखाना या बेस कॅम्पवर भेट देत कुटुंबांची विचारपूस केली. पूरग्रस्तांसाठी छावणी उभारून त्यांच्या राहण्याची व जेवणाची व्यवस्था केल्याबद्दल गुरुदत्त शुगर कारखान्याचे चेअरमन व कार्यकारी संचालक माधवराव घाडगे यांच्या कामाचे कौतुक केले. पालकमंत्री पुढे म्हणाले, गुरुदत्त कारखाना प्रमाणेच अन्य कारखानदारांनी देखील जनावरांना चारा पुरवण्यासाठी पुढाकार घ्यावा. पूरस्थिती भागात मदत कार्य पोहोचवणे, आरोग्यसेवा देणे याबाबत आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्याशी चर्चा करून गतीने कार्यवाही करू, अशी ग्वाही पालकमंत्री सतेज पाटील यांनी पूरग्रस्तांना दिली.
पुढे म्हणाले, पुढील काही दिवस पावसाचा अंदाज असल्याने पुन्हा पूरस्थिती उद्भवू शकते. यासाठी 15 ऑगस्टपर्यंत नागरिकांनी छावणीत रहावे. जनावरांनाही छावणीमध्ये ठेवावे. असे अवाहनकरून आपल्या राहण्याची आणि जेवणाची, जनावरांच्या चारा पाण्याची व्यवस्था केली जाईल. असे देखील पाटील म्हणाले. पूर परिस्थिती ओसरल्यानंतर झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून सर्वतोपरी मदत दिली जाईल, असे आश्वासन पालकमंत्री सतेज पाटील यांनी ग्रामस्थांना दिले.