कोल्हापूर - जिल्ह्यात कोरोनाचा रुग्णदर तुलनात्मकरित्या खाली येत असला तरी अपेक्षेप्रमाणे रुग्णसंख्या कमी होत नाही. याची शास्त्रोक्त कारणे शोधून त्यातील त्रूटी दूर करायला हव्यात, असे सांगून कोल्हापूर जिल्ह्यातील रुग्णदर नियंत्रणात आणण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न करा, अशा सूचना पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिल्या. कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना प्रादुर्भाव परिस्थितीबाबत पालकमंत्री सतेज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजर्षी शाहूजी सभागृहात आढावा बैठक झाली, यावेळी ते बोलत होते.
कोरोना रुग्णदर नियंत्रणात आणण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न करा - पालकमंत्री सतेज पाटील यांची सूचना
कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना प्रादुर्भाव परिस्थितीबाबत पालकमंत्री सतेज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजर्षी शाहूजी सभागृहात आढावा बैठक झाली. जिल्ह्यातील रुग्णदर नियंत्रणात आणण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न करा, अशा सूचना पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिल्या.
गृह विलगीकरण प्रभावीपणे करा -
पालकमंत्री सतेज पाटील यांनी जिल्ह्यात कोरोनाचा रुग्णदर, मृत्यूदर, वैद्यकीय उपचार सेवा सुविधा आदी बाबींचा सविस्तर आढावा घेतला. त्यानंतर ते म्हणाले, ग्रामीण भागामध्ये कोरोना रुग्णसंख्या वाढत असून याची कारणमीमांसा करणे गरजेचे आहे. रुग्णसंख्या अधिक असणाऱ्या गावांमधील कोरोना नियंत्रणासाठी यंत्रणेने अधिक प्रयत्न करावेत. कोरोना नियंत्रणासाठी हॉटस्पॉट गावांमध्ये नियमांची कडक अंमलबजावणी करा. गृह विलगीकरण प्रभावीपणे होतेय का यावर लक्ष ठेवा, अशा सूचना देऊन गृह विलगीकरणातील रुग्ण, बाधित रुग्णांची संख्या, मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या, उपलब्ध खाटा आदी माहिती ऑनलाइन अद्ययावत करावी, असेही त्यांनी सांगितले. या बैठकीच्या सुरुवातीला प्र. जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांनी जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, अपर जिल्हाधिकारी किशोर पवार, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलांडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल माळी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळी आदी उपस्थित होते.