कोल्हापूर - पालकमंत्री सतेज पाटील यांनी परतीच्या पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली. तसेच प्रत्येक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या असून येत्या 30 ऑक्टोबरपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे सांगितले. यासाठी आवश्यक ते सर्व निर्देश तलाठी आणि ग्रामसेवकांना दिल्याचे ते म्हणाले.
पालकमंत्री सतेज पाटलांनी केली नुकसानग्रस्त भागाची पाहाणी आज सकाळपासून त्यांनी चंदगड तालुक्यातील अतिवृष्टी, वादळीवारे व ढगफुटीमुळे झालेल्या नुकसानाची पाहाणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना देखील पंचनाम्यात सहकार्य करण्याचे आवाहन केले.
ज्या शेतकऱ्यांच्या नुकसानाचा पंचनामा झाला नसेल, त्यांनी तत्काळ संबंधितांना याबाबत माहिती देऊन पंचनामा करून घेण्याचे आवाहन त्यांनी केले. या प्रक्रियेतून एखादा नुकसानग्रस्त शेतकरी सुटल्यास त्याला ग्रामसेवक आणि तलाठ्यांना जबाबदार धरण्यात येईल, असे सतेज पाटलांनी स्पष्ट केले.
पालकमंत्री सतेज पाटील यांचा पाहाणीदौरा राज्य सरकार सुद्धा नुकसान भरपाईसाठी गंभीरपणे लक्ष देऊन पाऊले उचलत असल्याचे त्यांनी म्हटले. त्यामुळे एकही शेतकरी यामध्ये वंचित राहता कामा नये, असेही सतेज पाटील यांनी म्हटले. नुकसान भरपाई देण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे ते म्हणाले.