महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोल्हापुरात महाडिक -पाटील वादात पुन्हा ठिणगी; राजाराम कारखान्याच्या एमडींना बेदम मारहाण - सतेज पाटील

Satej Patil Mahadik Controversy : कोल्हापुरात माजी मंत्री आणि काँग्रेसचे नेते सतेज पाटील (Satej Patil) आणि माजी आमदार अमल महाडिक गटातील वाद चिघळला आहे. सतेज पाटील गटाच्या समर्थकांनी कसबा बावड्यात छत्रपती राजाराम कारखान्याचे कार्यकारी संचालक प्रकाश चिटणीस यांना बेदम मारहाण केली आहे.

Mahadik-Patil controversy
महाडिक -पाटील वादात पुन्हा ठिणगी

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 2, 2024, 11:05 PM IST

राजाराम कारखान्याच्या एमडींना बेदम मारहाण

कोल्हापूर Satej Patil Mahadik Controversy :राजकीय द्वेषातून विरोधी गटाच्या ऊस उत्पादकाचा ऊस नेला जात नसल्याचा आरोप करत, आमदार सतेज पाटील (Satej Patil) गटाच्या समर्थकांनी कसबा बावड्यात छत्रपती राजाराम कारखान्याचे कार्यकारी संचालक प्रकाश चिटणीस यांना बेदम मारहाण केल्याने, जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. राजाराम कारखान्यात सत्ता मिळवण्यात आमदार सतेज पाटील गटाला अपयश आले. कारखान्याच्या निवडणुकीपासून आतापर्यंत दोन्ही गटात धुसपुस सुरू होती. आज आमदार पाटील समर्थकांनी एमडी चिटणीस यांची गाडी अडवून त्यांना बेदम मारहाण केल्याने, कोल्हापुरात महाडिक-पाटील वादात पुन्हा एकदा संघर्षाची ठिणगी पडली आहे.

आठ दिवसाचा अल्टिमेटम :कोल्हापुरातील कसबा बावडा येथील श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या ताब्यात आहे. चार महिन्यापूर्वी झालेल्या साखर कारखान्याच्या निवडणुकीत भाजपचे माजी आमदार अमल महाडिक यांच्या नेतृत्वाखाली महाडिकटाच्या पॅनेलने, विरोधी काँग्रेस आमदार सतेज पाटील गटाचा ध्रुवा उडवत कारखान्यावर एकतर्फी वर्चस्व निर्माण केले आहे. कारखान्याच्या निवडणुकीनंतर अपात्र सभासदांचा मुद्दा घेऊन आमदार सतेज पाटील गटांनी साखर सहसंचालक कार्यालयाकडे याबाबतची तक्रार केली होती, आज साखर सहसंचालक कार्यालयावर धडक मोर्चा काढत तक्रार दाखल केली. आपल्यावर अन्याय होत असल्याबाबत निवेदन देण्यात आले आहे. तसेच आठ दिवसाचा अल्टिमेटम देत विरोधी सभासदांचे ऊस घेतले नाही तर मी स्वतः सभासद घेऊन कारखान्यावर येईल असा इशाराही सतेज पाटील यांनी आज दिला होता.



कारखाना चेअरमन अमल महाडिकांचे जोरदार प्रत्युत्तर : आमदार सतेज पाटील गटाच्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आज साखर सहसंचालक कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन दिले. यानंतर आज दुपारी कारखान्याचे चेअरमन माजी आमदार अमल महाडिक यांनी पत्रकार परिषद घेऊन आमदार सतेज पाटील यांचा समाचार घेतला होता, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी कारखाना प्रशासन कार्यरत आहे मात्र स्वतःचा डी वाय पाटील कारखाना खाजगीकरण करून आमदार सतेज पाटील सहकार मोडीत काढत आहेत असा आरोप यावेळी महाडिक यांनी केला.


लाथा बुक्क्यांनी कार्यकारी संचालकांना मारहाण : आज सायंकाळी साडेसहाच्या सुमारास कारखान्याचे कार्यकारी संचालक प्रकाश चिटणीस हे आपले काम संपवून कसबा बावडा येथील मुख्य मार्गावरून जात असताना, पाटील गल्लीसमोर संतप्त झालेल्या शेतकरी सभासदांनी त्यांची गाडी अडवली. कार्यकारी संचालक यांना काही कळण्याच्या आतच गाडीतून बाहेर ओढून लाथा बुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीत कार्यकारी संचालकांचे कपडे फाटले असून त्यांना जबर मार लागला आहे. दरम्यान या सर्व मारहाणी विरोधात महाडिक गट आक्रमक झाला आहे. पोलीस अधीक्षक कार्यालयात महाडिक गटाच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली आहे.



गृहमंत्री फडणवीसांशी चर्चा: कारखान्याचे चेअरमन माजी आमदार अमल महाडिक यांनी कोल्हापुरातील पोलीस अधीक्षक कार्यालयात जाऊन पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांची भेट घेतली. तत्पूर्वी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन द्वारे महाडिक यांनी माहिती दिली. परिसरातील सीसीटीव्हीच्या आधारे मारहाण करणाऱ्यांचा शोध घेण्याचं काम पोलीस करत आहेत. तसेच संशयीतांवर गुन्हे दाखल करणार असल्याचं यावेळी पोलीस अधीक्षक पंडित यांनी सांगितलं. तर राजर्षी शाहू महाराजांच्या कोल्हापुरात अशी गुंडगिरी खपवून घेणार नाही असा इशारा, माजी आमदार अमल महाडिक यांनी यावेळी दिला.


हेही वाचा -

  1. कोल्हापुरातील लॉकडाऊनच्या मागणीवरून महाडिक-पाटील आमने-सामने
  2. राजाराम कारखान्याच्या सभेत पुन्हा महाडिक-पाटील गट 'आमने-सामने'

ABOUT THE AUTHOR

...view details