कोल्हापूर- या वर्षीचा गळीत हंगाम सुरू होऊन दीड महिना झाला तरीही सांगली जिल्ह्यातील कारखान्यांनी अद्याप एकरकमी एफआरपी दिलेली नाही. कारखान्यांनी थकवलेले 938 कोटी रुपये तत्काळ द्यावे, कायद्याप्रमाणे त्याचे व्याज मिळावे, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा कोल्हापुरातील प्रादेशिक साखर सहसंचालक यांना सांगली जिल्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून निवेदनाद्वारे देण्यात आला. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपले शर्ट काढून हे निवेदन प्रशासनाला दिले.
..अन्यथा तीव्र आंदोलन करू, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा इशारा - प्रादेशिक साखर सहसंचालक
सांगली जिल्ह्यातील कारखान्यांनी अद्याप एकरकमी एफआरपी दिलेली नाही, यासाठी सांगलीतील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कोल्हापुरातील प्रादेशिक साखर सहसंचालकांना निवेदन दिले.
जोपर्यंत निर्णय देत नाही, तोपर्यंत आम्ही कार्यालयातच थांबू, असा इशारा कार्यकर्त्यांनी दिला. यावर उद्या (दि. 23 जानेवारी) सांगलीतील सर्व कारखान्याच्या कार्यकारी संचालकांची बैठक घेण्यात येणार आहे. त्यामध्ये योग्य त्या सूचना देण्यात येतील आपल्यालाही याबाबत कळविण्यात येईल, असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलकांनी आपला निर्णय मागे घेतला. शिवाय निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही संघटनेने उपसंचालकांना दिला.
हेही वाचा - कडकनाथ कोंबडी घोटाळा : कोल्हापुरात पहिला बळी