कोल्हापूर -राज्यात आजही कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. अनेकांना व्हेंटिलेटर बेड मिळत नाहीत. कोरोनाचा धोका अजूनही टळला नाहीये याची खासदार संभाजीराजेंना जाणीव आहे. त्यामुळेच ते टप्प्याटप्प्याने आपली भूमिका मांडत आहेत. मात्र दुसरीकडे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना नेमकं काय झाले आहे? काही माहीती नाही असे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हंटले आहे. शिवाय चंद्रकांत पाटील सत्ता गेल्यापासून अस्वस्थ झाले आहेत, आणि आता संभाजीराजेंनी आंदोलन केले पाहिजे मोर्चे काढले पाहिजे असे त्यांना वाटत आहे. मात्र संभाजीराजे संयमाने आपली भूमिका मांडत असून, त्यांच्यासारख्या नेतृत्वाची आज गरज असल्याचेही मुश्रीफ यांनी म्हटले आहे. गडहिंग्लज येथील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, संभाजीराजे यांची भूमिका अगदी योग्य आहे. त्यामुळेच ते संयमाने पुढे जाऊयात असे म्हणत आहेत. मात्र चंद्रकांत पाटलांना वाटत आहे की, संभाजीराजेंनी आंदोलने, मोर्चे काढले पाहिजे. आंदोलकांना उसकवले पाहिजे. मात्र ज्या पद्धतीने संभाजीराजे संयमाने पुढे जात आहे, त्यामुळे संभाजीराजेच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाचे आंदोलन नक्कीच यशस्वी होईल.