कोल्हापूर - खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा समाजाच्या प्रमुख न्याय व हक्कासाठी आझाद मैदान येथे आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. संभाजीराजेंच्या या निर्णयानंतर आता आंदोलनाची धग महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पसरु लागली आहे. येत्या शनिवारी 26 फेब्रुवारीपासुन सुरू होणाऱ्या आंदोलनाच्या तयारीसाठी गुरुवारी कोल्हापूरातून संयोजकांचे पथक भवानी मंडपातुन मुंबईकडे रवाना झाले.
राज्यभरातून अनेक ग्रामपंचायत तसेच संस्था तालीमींचा पाठिंबा
संभाजीराजेंनी मराठा आरक्षण आणि विविध मागन्यांसाठी येत्या शनिवार पासून आझाद मैदान येथे उपोषणाची घोषणा केली आहे. त्यांच्या या आंदोलनासाठी राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळताना पाहायला मिळत आहे. शिवाय छत्रपती घराण्यातील व्यक्ती उपोषणासाठी बसणार ही सुद्धा एक मोठी गोष्ट असणार आहे त्यामुळे अनेकांचा पाठिंबा मिळत असुन जिल्ह्यासह राज्यातील ग्रामपंचायत, तालीम तसेच संस्थांनी पाठिंब्याचे पत्र संभाजीराजेंना पाठवले आहे. शिवाय या उपोषणासाठी महाराष्ट्रातून येणाऱ्या मराठा बांधवांना पोलिसांनी अटकाव करू नये अशी विनंती सुद्धा संभाजीराजेंनी आज केली आहे.
म्हणून उपोषणाचा निर्णय -
5 मे 2021 रोजी मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर समाजाच्या उन्नतीसाठी आम्ही शासनाकडे प्रमुख मागण्या केल्या होत्या. 17 जून 2021 रोजी मुंबई येथे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व प्रमुख मंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीमध्ये या मागण्या शासनाने मान्य करून त्या पूर्ण करण्यासाठी पंधरा दिवसांचा वेळ मागितला होता. त्यासाठी दीड महिन्यांचा वेळ दिला मात्र आज आठ महिने उलटले तरी अद्याप समाजाच्या मागण्यांवर कोणतीही ठोस कार्यवाही केलेली नाही. यामुळे, समाजाला न्याय मिळावा यासाठी शनिवारी 26 फेब्रुवारी पासून आझाद मैदान, मुंबई येथून स्वतः संभाजीराजे छत्रपती आमरण उपोषणास बसणार आहे.