कोल्हापूर - भारतीय पुरातत्त्व विभागाच्यावतीने शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला किल्ले रायगडावर करण्यात आलेल्या विद्युतरोषणाईवर खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. शिवाय ही विद्युतरोषणाई अतिशय विचित्र स्वरूपाची आणि महान वारशाचा अपमान करणारी आहे, असेही त्यांनी म्हटले. एव्हढेच नाही, तर भारतीय पुरातत्त्व विभागाच्या इतिहासात आजचा दिवस काळा दिवस म्हणून गणला जाईल, असेही त्यांनी म्हटले. फेसबुक पोस्ट करून त्यांनी हा निषेध व्यक्त केला.
तीव्र शब्दात निषेध -
दरवर्षी 19 फेब्रुवारी रोजी सर्वत्र शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी होत असते. मात्र, शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला भारतीय पुरातत्त्व विभागाकडून करण्यात आलेल्या विद्युतरोषणाईवर संभाजीराजेंनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांनी फेसबुक पोस्टद्वारे आपली नाराजी व्यक्त करत, 'भारतीय पुरातत्त्व विभागाचे अधिकारी महान ऐतिहासिक स्थळांच्या प्रती असंवेदनशील झाले आहेत. रंगबेरंगी प्रकाश योजना वापरल्याने हे पवित्र स्मारक डिस्कोथेक सारखे दिसत आहे. एक शिवभक्त म्हणून मी मनातून दु:खी झालो असून या घडलेल्या प्रकारचा तीव्र निषेध करतो, असे त्यांनी म्हटले.